कोल्हापूर : किल्ले विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर गेल्या अडीच महिन्यांपासून कोल्हापूर पोलिसांनी दोन पथके लावूनही 'अदृश्य' असलेला प्रमुख संशयित आरोपी रवींद्र पडवळ कणेरी मठावर प्रकट झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांच्या दोन पथकांना "शोधून" सापडत नसलेला पडवळ उजळ माथ्याने वावरत असल्याने इतका मोठं अभय कोण देत आहे असा प्रश्न विचारला जात आहे.  


विशाळगड दंगलीतील फरार आरोपी अगदी 'निवांत' कणेरी मठावर!


विशाळगड दंगलीत पुण्यातील रवींद्र पडवळ आणि कोल्हापुरातील बंडा साळोखे प्रमुख संशयित आरोपी आहेत. त्याच रवींद्र पडवळने रामगिरी महाराज आणि अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांची भेट घेतली आहे. रामगिरी महाराज सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आहेत. विशेष म्हणजे दंगलीतील आरोपी स्वत: सोशल मीडियात पोस्ट करत असूनही तो इतका 'अदृश्य' दाखवण्यात कोणाचा हात आहे अशीही चर्चा आहे. रवींद्र पडवळने स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला आहे. विशाळगड दंगलीनंतर रवींद्र पडवळ अजूनही पोलिसांच्या कागदोपत्री फरार आहे. कोल्हापूर पोलिसांची दोन पथकं पडवळच्या शोधासाठी काम करत आहेत. 


रवींद्र पडवळला कोणाचे अभय?


सोशल मीडियात चमकोगिरी ते देवदर्शन करत असूनही 15 जुलैपासून रवी पडवळ कोल्हापूर पोलिसांना सापडत नसल्याने दंगलग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार तर नाही ना? असाही सवाल उपस्थित झाला आहे. कणेरी मठावर पार पडलेल्या संत समावेश कार्यक्रमात सुद्धा उपस्थिती लावल्याची चर्चा आहे. याच कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती लावली होती. त्यामुळे रवींद्र पडवळला कोणाचे अभय? असा सवाल केला जात आहे. 


संभाजी राजे विशाळगडावर पोहोचण्यापूर्वीच गजापुरात हिंसाचार


दरम्यान, विशाळगड दंगल प्रकरणात माजी खासदार संभाजी राजे छत्रपती विशाळगडावर पोहोचण्यापूर्वीच पायथ्याला गजापुरात हिंसाचार झाला होता. दुसरीकडे, विशाळगड दंगली प्रकरणी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंदवणार असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितले होते. मात्र त्यांच्यावर कोणत्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला, त्यांच्यावर गुन्हा खरोखरच नोंदवला आहे की नाही? याबाबत पोलिसांनी अजूनही स्पष्टता दिलेली नाही विशाळगड दंगलीचा आरोप ठेवत संभाजीराजे यांच्या अटकेची मागणी कोल्हापूरमधून करण्यात आली होती. पोलिसांकडून पुण्याच्या रवींद्र पडवळ, कोल्हापूरचे  बंडा साळोखे यांच्यासह 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पडवळ, बंडा साळोखेकडून दंगलीसाठी चिथावणी


विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी हाक दिलेल्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती समर्थकांसह विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचण्यापूर्वीच हिंदू बांधव समिती आणि सेवाव्रत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गडाच्या पायथ्याला प्रचंड तोडफोड केली होती. जमावबंदी लागू असल्याने आंदोलन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते. त्याकडे दुर्लक्ष करून तोडफोड करण्यात आली होती. दुसरीकडे, कोल्हापुरातील सेवाव्रत संघटनेचे बंडा साळोखे यांनी सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल करून कार्यकर्त्यांना गडावर येण्याचे आवाहन केले होते. त्यांनीच गडावरील आणि पायथ्याच्या तोडफोडीसाठी चिथावणी दिल्याचे काही व्हिडिओतून समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी पडवळ आणि साळोखे यांच्यावर दंगलीला कारणीभूत ठरल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय प्रत्यक्ष घरांची तोडफोड करणाऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या