कोल्हापूर : अवघ्या एकच दिवसांपूर्वी कोकण रेल्वेला जोडणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गासाठी गती घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसचे गिफ्ट मिळणार आहे. राज्याला पाचवी वंदे भारत लवकरच मिळणार असून ती कोल्हापूर ते मुंबई मार्गावर धावणार आहे. यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. सद्यस्थितीत कोल्हापूर ते मुंबई मार्गावर रेल्वे प्रवाशांना लागणारा वेळ आणि अवघी एक गाडी असल्याने अनंत मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. कोल्हापूरकरांना वंदे भारतसाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी वेगवान प्रवासाच्या आशा नक्की पल्लवित झाल्या आहेत. 


महाराष्ट्राची पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मुंबई आणि कोल्हापूर दरम्यान दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि मिरज जंक्शन येथे थांबेल. मुंबई आणि कोल्हापूर दरम्यानच्या वंदे भारतला फक्त 7 तास लागतील आणि या शहरांमधील प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूर बारा महिने पर्यटकांनी बहरुन जाते. मात्र, प्रवासात खूप वेळ जात असल्याने मोठी कुचंबणा होत आहे. 


तांत्रिक अडचणींमुळे वेळ लागणार 


वंदे भारत सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असल्या, तरी तत्काळ सुरू होईल याची शक्यता कमी आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणींचं कारण देत या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस मार्च 2024 नंतर धावू शकते असं म्हटलं आहे. या मार्गावरील तांत्रिक अडचणी, रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण, पुणे मिरज मार्ग दुहेरी करण्याची काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या मिरज- पुणे मार्गाचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्याचं काम सुरु आहे. कोल्हापूर आणि मिरज दरम्यानचा मार्ग एकेरी आहे, जेव्हा आमची कामं पूर्ण होतील, त्यावेळी वंदे भारत ट्रेन सुरु करणं शक्य होईल, अशी भूमिका विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी अलीकडेच मांडली होती. 


दुसरीकडे, मुंबईहून कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप आहे. मात्र, ट्रेनला लागणाऱ्या वेळेमुळे अनेकजण कोल्हापूरला येण्याचे टाळतात. कोल्हापुरातूनही देशभर पर्यटक जात असतात, त्यांच्यासाठी देखील ही ट्रेन खूप महत्त्वाची आहे. संपूर्ण देशात आतापर्यंत 25 वंदे भारत एक्स्प्रेस कार्यरत आहेत. महाराष्ट्रामध्ये चार मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. मुंबईहून कोल्हापूरला वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद देखील प्रचंड असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या