Indian Gava in Kolhapur : कोल्हापूर शहर आणि जिल्हा (Indian Gava in Kolhapur) परिसरात गव्यांचा गवगवा सुरुच असल्याने शेतकरी दहशतीखाली आहेत. गेल्या 15 दिवसांपासून गव्यांचा कळप कोल्हापूरच्या वेशीवर विविध ठिकाणी दिसून येत असल्याने चांगलीच दहशत पसरली आहे. आता या यादीमध्ये सादळे मादळे डोंगराची भर पडली आहे. आज सादळेच्या सिद्धेश्वर डोंगरात दोन गवे काही ग्रामस्थांना दिसून आले.


ज्वारी, गवत कापणीच्या हंगामातच परिसरात गव्यांचा वावर असल्याने भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून गव्यांचे ठसे कासारवाडी शिवारात दिसून आले होते. सिद्धेश्वर डोंगरावर साफसफाई सुरु असताना  दोन गवे मनपाडळेच्या दिशेने जाताना दिसून आले. त्यामुळे प्रत्यक्षदर्शींनी गवत कापण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी सतर्क केले. विशेष म्हणजे गेल्यावर्षी जानेवारीत याच परिसरात गव्यांचे दर्शन (Indian Gava in Kolhapur) झाल्यानंतर जवळपास सात महिन्यांपासून त्यांचा वावर सुरुच होता.  


ही घटना ताजी असतानाच गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कोल्हापूर शहरातील रमणमळा परिसरात ऊसाच्या फडात गव्यांचा कळप दिसून आला होता. मानवी वस्तीत गवे येऊ नयेत, यासाठी वनविभागाकडून डोळ्यात तेल घालून पहारा देण्यात येत असला, तरी गवे शेतातून मुक्काम सोडत नसल्याने चिंता वाढत चालली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गव्यांचा मानवी वस्तीतील वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कसबा बावडा परिसरातील विविध मळ्यात गव्यांच्या कळपाची लपाछपी सुरु असतानाच 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी गवे वडणगे परिसरात दिसून आले. हा पाच गव्यांचा कळप असून त्यातीत दोन गव्यांची पूर्णत: वाढ झाली आहे. वडणगे पोवार पाणंद मार्गावर बंडगर मळ्यातील ऊसाच्या शेतात गव्यांचा कळप ट्रॅक्टरने नांगरणी करण्यासाठी गेल्यानंतर बाळासाहेब काटे यांना दिसून आला.


Indian Gava in Kolhapur : वर्षभर गव्यांचा गवगवा सुरुच 


त्यापूर्वी गव्यांच्या कळपाने शंभर फुटी रोडवर ऊसाच्या फडाच्या शेतीत तळ ठोकलेला दिसून आला होता. एका शेतात सकाळच्या सुमारास गव्यांचा कळप पाहिला होता. तत्पूर्वी, सहा महिन्यांपूर्वी गव्याच्या हल्ल्यात एका तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू झाला होता. ऑक्टोबर महिन्यात आजरा तालुक्यात एका महिला गव्याच्या तावडीतून थोडक्यात बचावली होती. तालुक्यातील भावेवाडीत ही घटना घडली होती. गवा शिरल्याने गावकरी ग्रामस्थ हुसकावून लावत असतानाच गव्याने मुख्य रस्त्याच्या दिशेने पळ काढला होता.


इतर महत्वाच्या बातम्या