Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडून ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानात निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलं आहे. 7 जानेवारी रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान रंगणार आहे. या निकाली कुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची उपस्थिती असणार असल्याची माहिती तालीम संघाचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी दिली. शरद पवार यांच्या हस्ते शाहू महाराज यांना चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असल्याचे व्ही. बी. पाटील यांनी सांगितले.
प्रथम क्रमांकाची कुस्ती विजयी शाहू गंगावेस तालमीचा पैलवान महान भारत केसरी सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा पैलवान हिंदकेसरी भारत केसरी गौरव मच्छीवाला यांच्यात होईल. गंगावेस तालमीचा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विरुद्ध पंजाब गुरुभवानी आखाड्याचा मल्ल सतनाम सिंग यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी लढत होईल. सिकंदर शेखने पंजाब,उत्तर प्रदेश, हरियाणामधील नामवंत मल्लांना अस्मान दाखवून पंजाबमध्ये सर्वाधिक कुस्त्या जिंकलेला मल्ल म्हणून नावलौकिक मिळवला आहे. गौरव मच्छीवाला हा हिंदकेसरी असून त्याने आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday : छत्रपती घराण्याला मोठा मान
निकाली कुस्त्यांच्या पार्श्वभूमीवर खासबाग मैदानाची स्वच्छता व डागडूजी करण्याचे काम कोल्हापूर महापालिकेकडून सुरू करण्यात आलं आहे. कोल्हापूर शहरातील सामाजिक, राजकीय पक्षांबरोबरच नागरिकांशी श्रीमंत शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday) यांचे विशेष नाते आहे. केशवराव भोसले नाट्यगृहात त्यांच्या हस्ते श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा सत्कार होणार आहे. छत्रपती शाहू महाराज व शिवाजी महाराज यांचे वारस असल्याने छत्रपती घराण्याला मोठा मान आहे. क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही या घराण्याचे मोठे योगदान आहे. पुरोगामी विचाराशी आपली नाळ कायम ठेवत शाहू महाराजांनी राज्यभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे शाहू महाराज यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यासाठीच जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या