Hasan Mushrif ED Raid : माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने दोन महिन्यात आज (11 मार्च) तिसऱ्यांदा छापेमारी केली. आज झालेल्या छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांची कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी करण्यात आली. अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानातून 4 वाजून 35 मिनिटांनी बाहेर पडले. ईडीच्या पथकाने येताना सोबत प्रिंटरही आणला होता. अधिकाऱ्यांनी सर्वांचा जबाब नोंदवून घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या छापेमारीत तिन्ही वेळची एकच टीम होती. मात्र, आजच्या टीममध्ये अधिक अधिकाऱ्यांची संख्या होती.
सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याशी निगडीत कर्ज प्रकरणांची ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित ईडीकडून चौकशी सुरु आहे. आतापर्यंत ईडीकडून हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, पुण्यातील ब्रिक्स कंपनीशी निगडीत तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, मुलीचे घर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालय तसेच कागल तालुक्यातील सेनापती कापशी आणि गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील जिल्हा बँकेच्या शाखेवर छापेमारी करण्यात आली आहे. आतापर्यंत केलेल्या छापेमारीचा कोणताही तपशील समोर आलेला नाही.
हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आतापर्यंत ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुरगूड पोलिस ठाण्यातही त्यांच्यावर 40 कोटींचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागलमध्ये मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी साडे नऊ तास सुरु होती. सकाळी सात वाजता ईडीचे पथक कागलमध्ये पोहोचले. छापेमारी सुरु असताना मुश्रीफ यांची दोन मुले घरी होती. दरम्यान, हसन मुश्रीफ अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुंबईत आहेत. मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी घरात लहान मुलं तसेच मोठा मुलगा आजारी असतानाही ईडीकडून चौकशी होत असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती.
आम्हाला गोळ्या घालून संपवून टाका
दरम्यान, तिसऱ्यांदा ईडी कारवाईनंतर मुश्रीफ यांच्या पत्नीला भावना अनावर झाल्या. त्या म्हणाल्या की, कितीवेळा येणार या ठिकाणी? किती त्रास द्यायचा? रोज उठून तेच सुरू आहे, रात्रंदिवस जनतेसाठी राबणारा माणूस आहे आणि असं का करता? आम्ही करायच तरी काय? यांना सांगा आम्हाला एकदाच गोळ्या घालून संपवून टाकायला सांगा.
कार्यकर्त्यांचा आक्रोश
हसन मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्यांदा ईडीने कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. ईडीचे पथक निवासस्थानी पोहोचल्याचे समजताच त्या ठिकाणी मुश्रीफांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी गेटवरच ठिय्या मांडत छापेमारीचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांसमवेत मुश्रीफ यांचे खंदे समर्थक भैय्या मानेही उपस्थित होते. त्यांनी गेटवरच ठिय्या मांडताना निषेध केला. प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, जे काही जमलेले लोक आहेत ते समर्थक नव्हे, तर ते कामासाठी आलेले लोक आहेत. हसन मुश्रीफ ट्विट करतात आणि ईडी कारवाई होते, ईडीची बातमी त्यांना कशी कळते? अशी विचारणा त्यांनी केली.
कार्यकर्त्याने डोकं फोडून घेतलं
चौकशीचा वेळ वाढतच गेल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. मुश्रीफांच्या एका कार्यकर्त्यांने आपला रोष व्यक्त करताना आपलं डोकं फोडून घेतलं.
महाविकास आघाडीकडून कारवाईचा निषेध
दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून तिसऱ्यांदा छापेमारी झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच काँग्रेसकडून नाना पटोले, खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हसन मुश्रीफांवर तिसऱ्यांदा कारवाईचे आश्चर्य नाही, अनिल देशमुखांच्या केसमध्ये ईडी, सीबीआयकडून वर्ल्ड रेकाॅर्ड केला होता. 109 वेळा छापेमारी करण्यात आली होती. त्यामुळे ईडी सीबीआयने विक्रम केला होता तो मोडायचा असेल ही शक्यता नाकारता येत नाही. तिसऱ्यांदा घरी जात आहे, तर पहिल्या दोन कारवाईत काय झालं याची माहिती मिळत नाही हे दुर्दैव आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, उच्च न्यायालयाने कालच कोणत्या प्रकारे ताशेरे ओढले आहेत ते लक्षात घेणं आवश्यक होतं. एकाच ठिकाणी धाडी टाकणे, त्रास का तर विरोधात आहे म्हणून. गेल्या दोन वर्षांपासून त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. विरोधांमधील लोकांवर कारवाई होत आहे. सत्ताधाऱ्यांची चौकशी करत नाही.
दिलासा मिळाल्यानंतर 24 तासांच्या आत झटका
दुसरीकडे, ईडीच्या छापेमारीनंतर अडचणीत आलेल्या मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने कालच (10 मार्च) मोठा दिलासा दिला होता. 24 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालाने आदेश दिले आहेत. कोल्हापुरात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुश्रीफांवर सातत्याने आरोप केलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने तगडा झटका दिला आहे.
आरोप करणाऱ्या सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते? असा सवाल न्यायालयाने केला. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या