Kolhapur Water News: रोहिणी नक्षत्र पूर्णतः कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्रानेही सुद्धा सुरुवात होऊन 10 दिवस उलटूनही पावसाचा थेंबही पडला नसल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याची परिस्थिती दिवसागणिक भीषण होत चालली आहे. कोल्हापूर शहरात आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरासाठी पंचगंगा आणि भोगावती नदीपात्रातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणीउपसा करण्यासाठी दोन्ही नद्यांमध्ये अपेक्षित पाणी नसल्याने कोल्हापूर शहरामध्ये पहिल्यांदाच पाणी कपातीची वेळ आली आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल. कोल्हापुरात नद्यांची पाणीपातळी वाढत नाही तोपर्यंत शहराला एक दिवसाआड पाणी दिले जाईल. शहराच्या काही भागांत आज पाणी दिलं जाईल, तर उर्वरित विभागाला उद्या पाणी दिले जाईल. याच पद्धतीने पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे. उपसाकेंद्रे पूर्ण क्षमतेने चालू शकत नसल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. 


जिल्ह्यातील उभे संकटात, ऊस करपला 


दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास सर्वच प्रमुख नद्यांमध्ये पाटबंधारे विभागाकडून पाणी नियोजनासाठी उपसाबंदीचा खेळ सुरू असल्याने उभी पिके संकटात आली आहेत. त्याचा सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतातील ऊस हा उन्हाने करपून गेला आहे, त्यामुळे उघड्या डोळ्याने ऊस करपताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 


भाताची पेरणी संकटात 


दुसरीकडे रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर अनेक शेतकर्‍यांनी भात पेरणी केली आहे. मात्र, ही पेरणी आता पूर्णतः संकटात आली आहे. भुईमूग, सोयाबीनची पेरणी झालेलीच नाही. पाऊस लांबत गेल्याने ऊडीद, मुगासारख्या आंतरपीकांवरही विपरित परिणाम होणार आहे. गेल्या अठरा ते वीस दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात हलकासा शिडकावा सोडता कोणत्याही प्रकारचा पाऊस झालेला नाही. पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या राधानगरी, भुदरगड आणि गगनबावडा तालुक्यातही पाऊस झालेला नाही. मान्सूनपूर्व वळीव पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील नद्यांसह धरणांमधील पाणीसाठा तळाला गेला आहे.


पिण्यासाठीच पाणी वापरले जाणार 


कोल्हापूर शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रमुख धरणांपैकी राधानगरी, काळम्मावाडी आणि तुळशी धरणांमधील पाणीसाठा सुद्धा कमालीचा खालावला आहे. तिन्ही धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी झाली आहे. जलसंपदा विभागाने केलेल्या अंदाजानुसार पुढील किमान 20 ते 22 दिवस पाणी पुरेल इतकं पाणी या धरणांमध्ये आहे. त्यामुळे या पाण्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जाईल. गेल्यावर्षी राधानगरी, काळम्मावाडी आणि तुळशी धरणांमध्ये मिळून दहा टीएमसी इतका पाणीसाठा होता. मात्र, यंदा या तीन धरणांमध्ये फक्त चार टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा पूर्णतः पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जाणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या