Kolhapur Disaster Management : कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचे धडे सातासमुद्रापार पोहोचणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या देदीप्यमान आणि गौरवशाली इतिहासामध्ये आणखी एक सोनेरी पान जोडले गेले आहे. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात महापूर आल्यानंतर कोणतीही जीवितहानी होऊ न देता येतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कसे काम करते याचे धडे आता इंग्लंडच्या विद्यापीठात शिकवले जातील. तेथील विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश झाला आहे. 


या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी विद्यापीठाचे डॉक्टर सायमन यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2019 प्रलयकारी महापूर आला होता. त्यावेळी महिला सबलीकरणावरील माहितीपटासाठी सायमन भारतामध्ये आले होते. कोल्हापूरमधील महापुराची माहिती मिळाल्यानंतर ते कोल्हापूरमध्ये आले होते. 


अत्याधुनिक सोयीसुविधा नसतानाही केवळ मनुष्यबळ आणि माफक सामग्रीच्या जोरावर आपत्ती व्यवस्थापन पाहून ते चांगलेच प्रभावित झाले होते. इंग्लंडमधील टीसाईड विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन कोर्स सुरू करण्यात येणार असून त्यासाठी भारतातील एडीवायपी पुणे, संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर आणि एसआरएम चेन्नई या तीन विद्यापीठांसोबत करार केला आहे. 


या अभ्यासक्रमात कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापनचा समावेश केला आहे. हा अभ्यासक्रम ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू होणार असून संजय घोडावत विद्यापीठात प्रशिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या अभ्यासक्रमासाठी यंत्रणा संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमात सहभागी झाल्याने हे भूषणावह असल्याचे सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या