Ajit Pawar In Kolhapur : कोल्हापूरमध्येही गद्दार निघालेत, त्यांना जागा दाखववून देऊ, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेतेन अजित पवार यांनी कोल्हापूरमधील शिवसेना बंडखोरांना थेट इशारा दिला. अजित पवार यांच्या हस्ते आज पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी बोलताना शिंदे फडणवीस सरकारवर चौफेर हल्ला चढवला. शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी न्यायालयात खेचल्याबद्दलही त्यांनी चांगलेच शिंदे गटाला सुनावले.
शिंदे फडणवीस सरकार जातीय तेढ निर्माण करत आहे, जातीपातीचा विचार करून चालणार नाही. आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला चढवला.
शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा जे आमदार बाहेर पडले ते सगळेच पुढील निवडणुकीत पडल्याचे ते म्हणाले. भुजबळांसोबत आलेले 19 आमदार पडले, राणेंसोबत आलेले आमदारही पराभूत झाले. राणे पोटनिवडणुकीतही पडले. अजित पवार पुढे म्हणाले, बरेच लोक पंचायत कार्यालयाच्या उद्नघाटनसाठी तुम्ही या म्हणत होते. मी बऱ्याच दिवसांपूर्वी तारीख दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून दोन दिवस पाऊस होता. कोल्हापूरहून निघाल्यानंतरही पाऊस होता, पण पाऊस न पडता सभा पार पडली. पाऊस आणि राष्ट्रवादीचं जवळचं नातं आहे. मी मिरवणुकीला सहसा येत नाही, पण कोणाला नाराज केलं नाही. कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केलं. हाच उत्साह कायम ठेवायचा आहे. रॅलीतील सहभागी तरुणांचे आभार मानतो, महाराष्ट्रात बदल करून दाखवायचा आहे.
शिंदे गटावर हल्लाबोल
ते 50 खोके एकदम ओके आहे, हे महाराष्ट्रात घडलं नव्हतं. शिवसेना दसरा मेळावा ही बाळासाहेबांची परंपरा आहे. मात्र, शिवसेनेला कोर्टात जावं लागलं. दुसऱ्याचा विचार ऐकू देणार नाही, असं कसं चालेल? याचा विचार केला पाहिजे. सत्ता येते सत्ता जाते, जी जबाबदारी द्याल ती पार पडू. तोंडी सांगून सर्वसामान्यांचे सरकार होत नाही, दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे स्वत:हून माणसे आल्याचे हात उंचावून वारंवार सांगत होते. मग स्वत:हून आलेली निम्मी माणसं मध्येच का निघून गेली, निम्म्या खूर्च्या रिकाम्या का झाल्या? असा सवालही त्यांनी केला.
तिथं माणसं नाहीत, जनावर राहतात का?
दोन वर्ष कोरोनाने अडचणी होत्या, निधीला अडचणी होत्या. आम्ही आमदारांचा निधी 5 कोटी निधी केला. कोणताही भेदभाव केला नाही. मंजूर केलेली कामं यांनी थांबवली, तिथं माणसं नाहीत, जनावर राहतात का? भाजपच्या आमदारांना निधी देणार बाकीच्यांना नाही? थोडं उण्णीस बीस होईल, पण सत्ताधारी आमदारांना 50 कोटी दिले, तर 25 कोटी विरोधी आमदाराला दिले पाहिजेत. कारण तो साडे तीन ते पाच लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करतो. ताम्रपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही, एकनाथ शिंदे कायमचे बसायला आलेले नाहीत, 145 आकडा गेला की बाजूला व्हावं लागेल.
ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कोरोना संकट आले. राज्याला कोरोना संकटातून बाहेर काडण्याचं काम केलं. सगळ्याचे सोंग करता येते, पण पैशाचे सोंग करत नाही, याचा विसर पडू देता कामा नये. संकट असतानाही शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार थांबू दिला नाही. राज्यावर कर्ज वाढू दिलं नाही. राज्य व्यवस्थित पुढे नेण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांचे मार्गदर्शन घेतले. विचारधारा वेगळी होती, पण मतभेदाचे प्रश्न वेगळे ठेवले. आता ते वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या