Ajit Pawar In Kolhapur :  आता कोणतीही मॅच फिक्सिंग नाही, एकी टिकवायची आहे. शरद पवारांनी राजकारणात 55 वर्ष पाहिली, पण त्यामधील बहुंताश विरोधातच गेला. याच काळात त्यांनी महाराष्ट्र जवळून पाहिला. आम्हीही तेच अंगिकारलं आहे. शिंदे फडणवीस सरकार जातीय तेढ निर्माण करत आहे, जातीपातीचा विचार करून चालणार नाही. आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला चढवला.


अजित पवार यांच्या हस्ते आज पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले.  यावेळी अजित पवार यांनी बोलताना शिंदे फडणवीस सरकारवर चौफेर हल्ला चढवला. ते म्हणाले, महाविकास विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन आधार दिला. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजार अनुदान देण्याची घोषणा केली. ती मदत दिवाळीपूर्वी या सरकारने करावी. 


ताम्रपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही


दोन वर्ष कोरोनाने अडचणी होत्या, निधीला अडचणी होत्या. आम्ही आमदारांचा निधी 5 कोटी निधी केला. कोणताही भेदभाव केला नाही. मंजूर केलेली कामं यांनी थांबवली, तिथं माणसं नाहीत, जनावर राहतात का? भाजपच्या आमदारांना निधी देणार बाकीच्यांना नाही? थोडं उण्णीस बीस होईल, पण सत्ताधारी आमदारांना 50 कोटी दिले, तर 25 कोटी विरोधी आमदाराला दिले पाहिजेत. कारण तो साडे तीन ते पाच लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करतो. ताम्रपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही, एकनाथ शिंदे कायमचे बसायला आलेले नाहीत, 145 आकडा गेला की बाजूला व्हावं लागेल. 


ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कोरोना संकट आले. राज्याला कोरोना संकटातून बाहेर काडण्याचं काम केलं. सगळ्याचे सोंग करता येते, पण पैशाचे सोंग करत नाही, याचा विसर पडू देता कामा नये. संकट असतानाही शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार थांबू दिला नाही. राज्यावर कर्ज वाढू दिलं नाही. राज्य व्यवस्थित पुढे नेण्याचा प्रयत्न केला.  शरद पवारांचे मार्गदर्शन घेतले. विचारधारा वेगळी होती, पण मतभेदाचे प्रश्न वेगळे ठेवले. आता ते वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. 


40 आमदार पैशाचा पाऊस पाडताहेत, कुठून पैसा आला? 


यावेळी अजित पवार यांनी दसरा मेळाव्याला शिवसेनेला शिवाजी पार्क न देण्यावरून शिंदे गटाला चांगलेच फटकारले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात शेवटपर्यंत कोणी जाग्यावरून उठले नाहीत. निखाऱ्यावरून चालणार का विचारताच हो चालणार असे उद्धव ठाकरेंना शिवसैनिक समोरून म्हणत होते. 


मात्र, एकनाथ शिंदे स्वत:हून माणसे आल्याचे हात उंचावून वारंवार सांगत होते. मग स्वत:हून आलेली निम्मी माणसं का निघून गेली, निम्म्या खूर्च्या रिकाम्या का झाल्या? 10 कोटी कोठून आणले? लोकांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री झाला आहात. शिंदे महाराज हा महाराष्ट आहे, कोणत्या दिशेने नेणार ते सांगायला हवे. वेदांतासाठी दिल्लीला गेले, पण दिल्लीतून हात हालवत आले. महागाई, बेरोजगारीवर बोलले नाहीत. सीएनजी, गॅस , खतांच्या किंमती वाढत आहेत. साखर निर्यातीला बंधने आणत आहेत, तरीही बोलायला तयार नाहीत. तोंडी सांगून सर्वसामान्यांचे सरकार होत नाही, दुसऱ्या राज्यात प्रकल्प घालवणारे सरकार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. 40 आमदार पैशाचा पाऊस पाडताहेत, कुठून पैसा आला? असाही सवाल त्यांनी केला.  


सगळंच मला पाहिजे हे बरोबर नाही


राज्यात अजूनही पाऊस सुरु आहे. काय होणार आहेय याचा विचार करा. लोक उठून जायला लागली म्हणून भाषण थांबवलं, नाही तर चालूच ठेवलं असतं. राज्यात जे काही घडलं ते हे चांगलं झालेलं नाही. अशाने स्थिरता राहणार नाही, अधिकारी ऐकणार नाहीत, बहुमताची सरकार यांनी पाडली, तुम्ही देश चालवा, सगळंच मला पाहिजे हे बरोबर नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या