कोल्हापूर : खासदार शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी शिवभक्तांना अतिरेकी म्हणून संबोधलं हे अतिशय दुर्दैवी आहे, महाविकास आघाडीने कुणाच्या बाजूने आहे ते जाहीर करावं असं वक्तव्य भाजपचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केलं. विशाळगड प्रकरणी (Vishalgad Dispute)  शाहू महाराज हे कान धरून उभे राहिले हे पाहून खूप वाईट वाटलं, कारण शाहू महाराज हे आमच्या श्रद्धास्थानी आहेत असंही महाडिक म्हणाले. विशाळगड प्रकरणी सतेज पाटलांची भूमिका ही ढोंगी असल्याचं सांगत त्यांनी टीका केली. 


सतेज पाटलांची भूमिका ढोंगी, त्यांची चौकशी करा


विशाळगड प्रकरणावरून काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर टीका करताना धनंजय महाडिक म्हणाले की, "माजी पालकमंत्री हे अतिक्रमण केलेल्या लोकांना मदत करायला गेले, हे ढोंग आहे, पुतणा-मावशीचे प्रेम आहे. गेल्यावेळी देखील माजी पालकमंत्री यांनी कोल्हापुरात दंगल होणार असं म्हटलेलं. त्यांच्या या सगळ्या वक्तव्यांची चौकशी झाली पाहिजे. लोकसभेच्या वेळी देखील त्यांनी असंच वक्तव्य केलं होतं. काही महिन्यांपूर्वी दसरा चौकात शालेय मुलांच्या बसवर दगडफेक करण्यात आली होती, त्यावेळी तुमचे अश्रू कुठं गेले होते? हे केवळ मतांचे राजकारण सुरू झालं आहे."


इंडिया आघाडीचा हा अजेंडा आहे का? 


महाविकास आघाडी कुणासोबत आहे हे जाहीर करावं असं म्हणत धनंजय महाडिक म्हणाले की, "महाविकास आघाडीने शिवाजी महाराज यांच्यासोबत आहेत की अतिक्रमण केलेल्या नागरिकांसोबत हे जाहीर करावं. माजी पालकमंत्र्यांनी हे सगळं खापर प्रशासनावर फोडलं. हे अतिक्रमण आताचे नाही तर गेल्या 15 ते 20 वर्षांपूर्वी झालं आहे."


अतिक्रमण काढण्यासाठी आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैवी


धनंजय महाडिक म्हणाले की, "प्रशासनाने संभाजीराजे यांना का थांबवलं नाही असं माजी पालकमंत्री म्हणतात. मी त्यांना विचारतो तुम्ही का त्यांना थांबवलं नाही? एकाच घरात दोन भूमिका कशा असू शकतात? एकाने म्हणायचं पाडा आणि दुसऱ्यांने म्हणायचं पाडू नका. शाहू महाराज कान धरून उभे राहिले हे पाहून खूप वाईट वाटलं. कारण शाहू महाराज हे आमचे श्रद्धास्थान आहेत. विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी शिवभक्तांना आंदोलन करावं लागतं हे दुर्दैवी आहे. राज्यातील सर्व गडांवर असलेली अतिक्रमणे काढली पाहिजेत यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र देणार आहोत. 


विशाळगडवर झालेल्या प्रकारचा खरा सूत्रधार कोण हे शोधलं पाहिजे अशी मागणी करत धनंजय महाडिक म्हणाले की, "कारण पहिल्या दिवशी 21 जण पकडले गेले, त्यामध्ये कसबा बावड्यातील अनेकजण आहेत. त्यामुळे हे सगळं प्रकरण संशयास्पद आहे. सहज गेले आणि हे घडवलं असं नाही तर प्री-प्लॅन आहे. संभाजीराजे यांच्याबरोबर अनेक लोकांची इच्छा होती की अतिक्रमण काढावे. सरकारने देखील हे गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं."


ही बातमी वाचा: