कोल्हापूर : विशाळगड हिंसाचार प्रकरणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याचे सांगितलं आहे. मात्र, आता एमआयएमच्या कोल्हापुरातील मोर्चाला सकल हिंदू समाजाने कडाडून विरोध दर्शवला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील, जर कोल्हापुरात आले तर त्यांचं कोल्हापुरी पायतानाने स्वागत करू, या घटनेविरोधात एमआयएमने कोल्हापुरात मोर्चा काढल्यास 19 जुलैला सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी दिला आहे.


एमआयएमच्या मोर्चाला परवानगी दिली जाऊ नये


दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील एमआयएमच्या मोर्चाला परवानगी दिली जाऊ नये, याबाबत मी पोलिसांशी बोलणार असल्याचे म्हटले आहे. पोलिस याबाबत गाफील राहिले का याची देखील चौकशी करू, असे त्यांनी सांगितले. विशाळगड परिसरामध्ये यासीन भटकळ राहिल्याचे चर्चा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भटकळ कधी कोणाकडे राहिला होता याची चौकशी करणार असल्याचे मोठं मुश्रीफ यांनी केलं आहे. पोलिसांनी त्या संदर्भात काय भूमिका घेतली याबाबतही चौकशी करणार असल्याचे म्हटलं आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात कलम 163 जारी


किल्ले विशाळगड अनाधिकृत अतिक्रमणाबाबत तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करून सामाजिक अस्थिरता, तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कलम 163 जारी करण्यात आलं आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी 14 जुलै गजापुरात प्रचंड हिंसाचार झाला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात नासधुस करण्यात आली होती. मोठ्या संख्येने जमलेल्या जमावाने घोषणाबाजी करत अचानक दगडफेक करुन सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करुन नुकसान केले होते. 17 जुलै दुपारी दोन वाजल्यापासून कोणत्याही व्यक्तीस इंस्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमाद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश पाठविणे, खोटी माहिती पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे आणि कोल्हापूर जिल्हा हद्दीमध्ये वरील विषयाच्या अनुषंगाने व समाजात तेढ निर्माण होईल असे बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग प्रदर्शित करणेस मनाई करण्यात आली आहे. 


पोलीस अधीक्षकांवर कारवाई करा; विजय वडेट्टीवारांची मागणी


दरम्यान, सरकार सुपारी घेऊन काम करत असून मन क्लुषित करण्याचे काम सुरू आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात हिंसाचार होणार याची माहिती होती. तरीही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाचा कुठलाही संबंध नसताना काही लोकांनी हौदोस घातला, याला सरकार जबाबदार आहे. 50 मीटरवर एसपी महेंद्र पंडित थांबले होते, त्यांनीच लाठीमार करण्याचा इशारा दिला. सिलेंडर स्फोट केला, घर उडवले. कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडित यांच्यावार तत्काळ कारवाई करा, अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी यावेळी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर मांइंड कोण आहे याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या