कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी भाजप दावा करणार असून त्या ठिकाणी कृष्णराज महाडिक (Krishnaraaj Mahadik) देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत असं वक्तव्य भाजपचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली. शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर हे दोनवेळा आमदार होते, त्यामुळे त्यांचा दावा सहाजिकच असेल, पण पोटनिवडणुकीत भाजपने मोठी मतं घेतली होती असंही धनंजय महाडिक म्हणाले. 


लोकसभेनंतर आता विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून जिल्ह्यातील लक्षवेधी असलेल्या कोल्हापूर उत्तरचा उमेदवार कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक हे यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. 


कोल्हापूर उत्तरवर भाजपचा दावा


कोल्हापूर उत्तरच्या जागेवर बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, "कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर हे दोन वेळा आमदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा दावा साहजिक असेल. पण पोटनिवडणुकीमध्ये भाजपने खूप मते घेतली आहेत. भाजपचे महेश जाधव, राहुल चिकोडे, नाना कदम यांच्याबरोबर कृष्णराज महाडिक देखील कोल्हापूर उत्तरमधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आता कुणाला उमेदवारी द्यायची हे भाजपचे वरिष्ठ नेते ठरवतील. कोल्हापूर उत्तरचा उमेदवार हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजितदादा हे ठरवतील."


कृष्णराज महाडिक हे धनंजय महाडिक यांचे चिरंजीव असून त्यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. या आधी ते कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. कोल्हापूर दक्षिणमधून महाडिक कुटुंबीयांचे कट्ट्रर विरोधक आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे आमदार आहेत. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक यांचीही तयारी सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळेच कृष्णराज महाडिक यांनी आता कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. 


महायुतीत तिसरी आघाडी होणार नाही, अजित पवार हे महायुतीतून बाहेर जाणार नाहीत असा विश्वास धनंजय महाडिकांनी व्यक्त केला. 


कोल्हापुरात काही मंडळी वाद निर्माण करण्यासाठी आहेत. वाघनखं ही शिवाजी महाराजांच्या आहेत हे सरकारने जाहीर केलं आहे. शिवाजी महाराज यांचा आम्हाला अभिमान आहे असं धनंजय महाडिक म्हणाले. 


एमआयएम पक्षाने कोल्हापुरात मोर्चा काढायचा काय संबंध? आम्ही कोल्हापूरकर सक्षम आहोत, त्यांना कोल्हापुरात येऊ न देण्याची हिंदू एकताने घेतलेली भूमिका योग्य आहे असं धनंजय महाडिक म्हणाले. 


ही बातमी वाचा: