Dhananjay Mahadik : तब्बल आठ वर्षांनी विजयाची चव चाखलेल्या नुतन खासदार धनंजय महाडिक यांच्या स्वागताची जय्यत तयारी कोल्हापुरात करण्यात आली आहे. त्यांची मिरवणूक अंबाबाई मंदिरात येऊन संपणार आहे. दरम्यान, कोल्हापूरच्या दिशेने येत असतानाच कराडमध्येच धनंजय महाडिक यांनी जिल्ह्याचे पालकमत्री सतेज पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा त्यांनी स्पष्ट केली आहे. 


धनंजय महाडिक यांनी कराडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पुरेसं संख्याबळ असल्यानेच मला उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे घोडेबाजार करण्याचा मुद्दा येत नाहीत. आमदार काही विकावू नाहीत. राज्यसभेला गुप्त मतदान पद्धत नसतानाही भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील काही आमदारच नाराज आहेत त्यांनी कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांनी विधानपरिषद निवडणुकीवरूनही महाविकास आघाडी सरकारला जाहीर इशारा दिला.


महाडिकांचा दबदबा पुढील 100 वर्ष राहील


धनजंय महाडिक यांनी संघर्ष पाचवीलाच पुजला असल्याचे ते म्हणाले. राज्यात महाविकास आघाडी सरकार 2019 मध्ये अस्तित्वात आलं असलं, तरी हे तिन्ही पक्ष महाडिकांविरुद्ध कोल्हापूर लढल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरमध्ये भाजपचा एकही आमदार खासदार नाही, महापालिकेत सत्ता नाही, जिल्हा परिषदेत सत्ता होती, पण ती आता नाही. त्यामुळे सर्व सत्तास्थाने परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. महाडिकांचा दबदबा कालही होता, आजही आहे आणि पुढील 100 वर्ष राहिल असे सांगत त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना एकप्रकारे जाहीर इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे.


धनंजय महाडिकांच्या स्वागताची जय्यत तयारी


दरम्यान,  आज सायंकाळी 4 वाजता खासदार धनंजय महाडिक यांचे कोल्हापूरमध्ये आगमन होणार आहे. सलग पराभवानंतर महाडिक कुटुंबात विजय झाला असल्याने जल्लोषी स्वागताची तयारी करण्यात आली आहे. त्यांची प्रमुख मार्गाने मिरवणूक काढून सांगता अंबाबाई मंदिरात सांगता होईल. सोबत भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील सुद्धा असणार आहेत. माजी आमदार महादेवरावर महाडिक यांनी सुद्धा मुन्नाची मिरवणूक बघाच, असा सूचक इशारा काल दिला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या