बेळगाव : खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवर अडवणे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन (Mohammad Roshan IAS) यांना महागात पडण्याची चिन्हं आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून आपल्याला बेळगाव जिल्ह्यात प्रवेश नाकारल्याचा आरोप खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी केला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात हक्कभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली. धैर्यशील माने यांनी बिर्ला यांना त्यासंबंधी सविस्तर पत्र पाठवून न्यायाची मागणी केली आहे.
कर्नाटक राज्याच्या निर्मितीवेळी, 1 नोव्हेंबर 1956 रोजी बेळगावसह 865 गावांचा कर्नाटक राज्यात समावेश झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमाभागातील मराठी भाषिक जनता दरवर्षी ‘काळा दिन’ पाळते. या दिवशी काळे झेंडे दाखवत शांततेच्या मार्गाने आपला निषेध नोंदवला जातो.
Maharashtra Karnataka Dispute : धैर्यशील माने यांना अडवले
याच पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबर 2025 रोजी, सीमावादासंदर्भातील कायदेविषयक तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष या नात्याने खासदार धैर्यशील माने बेळगावकडे रवाना झाले होते. मात्र, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कथितरीत्या बेकायदेशीर नोटीस जारी करून पोलिसांच्या माध्यमातून सीमा भागात प्रवेश करण्यापासून अडवले, असा आरोप खासदार माने यांनी केला आहे.
Dhairyasheel Mane Letter To Om Birla : मूलभूत हक्कांचं उल्लंघन
कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना आणि देशाचा लोकप्रतिनिधी असतानाही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यापासून रोखणे हे संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांवर आघात करणारे आहे, असे धैर्यशील माने यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे, अशी ठाम मागणी खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.
ही बातमी वाचा: