Kolhapur News: कोल्हापुरात (Kolhapur News) ऐक्य दाखविण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत शिव-शाहू सद्भावना फेरी काढण्याचा निर्धार राजर्षी शाहू सलोखा मंचकडून करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक झाली. 


कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही


या बैठकीत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित कोल्हापूरची शाहू विचारांची परंपरा नमूद करताना शिवराज्यभिषेक दिनी घडलेली दंगल दुर्दैवी असल्याचे सांगितले. फेरीत काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी फेरी काढण्यात येऊ नये, अशी भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली. मंचचे वसंतराव मुळीक यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत फेरी निघणार असल्याने त्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही दिली. 


शिव-शाहू सद्भावना फेरी व सभेची जय्यत तयारी


दरम्यान, राजर्षी शाहू सलोखा मंचने 25 जूनला होणाऱ्या शिव-शाहू सद्भावना फेरी व सभेची जय्यत तयारी केली आहे. अठरापगड जाती समाजातील घटकांच्या गाठी-भेटी घेतल्या जात आहेत. हिंदू-मुस्लिम समाजातील एकोपा कायम ठेवण्यासाठी अधिकाधिक संख्येने बांधवांनी फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले जात आहे. नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारक परिसरातून फेरीस सुरवात होईल.


ऐक्याची ताकद दाखविण्यासाठी फेरीचे आयोजन


कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी हिंदू-मुस्लिम समाजात दंगल घडविण्याचा प्रयत्न झाला. शाहूनगरीत अघटित घडू नये, यासाठी शाहूप्रेमी नागरिक एकत्र झाले आहेत. पुरोगामी कोल्हापूरचा वारसा टिकविण्यासाठी त्यांनी येथील ऐक्याची ताकद दाखविण्यासाठी फेरीचे आयोजन केले आहे. त्याकरिता ठिकठिकाणी जाऊन मंचचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह त्यांचे सहकारी भेटी घेत आहेत. मुळीक यांनी 80 हून अधिक जाती समाजांचे संघटन केले असून, त्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत आहेत. त्याचबरोबर राजर्षी शाहू मंचकडून तयार केलेल्या आचारसंहितेची माहिती सर्व घटकांपर्यंत पोहोचवली जात आहे. ठिकठिकाणी जाऊन मंचच्या कार्यकर्त्यांकडून लोकाच्या भेटीगाठीही घेतल्या जात आहेत. 


यावेळी, माजी महापौर आर. के. पोवार, वसंतराव मुळीक, राजू लाटकर, दिलीप पवार, इंद्रजित सावंत, बबनराव रानगे, सतीश कांबळे, उदय नारकर, डी. जे. भास्कर, गिरीश फोंडे, सरलाताई पाटील, भारती पोवार, शैलजा भोसले, अजित सासने, रवी जाधव, विजय पाटील, संदीप देसाई उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या