Narsobawadi : कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडीमध्ये दक्षिणद्वार सोहळा आज पहाटे पार पडला. कृष्णा नदीचे पाणी मुख्य मंदिरामध्ये उत्तर द्वारात येऊन ते गाभाऱ्यात पादुकांना स्पर्श करून ते दक्षिणेकडे बाहेर पडते. हा सोहळ्यावेळी स्नान करण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. 


कृष्णेचे पाणी रविवार मंदिराच्या मंडपामध्ये आले होते. मात्र, पाणी संथ गतीने वाढत असल्याने दक्षिणदार सोहळा केव्हा होणार याकडे भाविकांचे लक्ष लागले होते. आज पहाटे तीन वाजता श्रींच्या पादुकांना स्पर्श करून कृष्णा माई दक्षिण द्वारातून बाहेर पडल्याने दक्षिणदार सोहळा संपन्न झाला. दिंगबर दिंगबरच्या जयघोषात भविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.


दक्षिणद्वार सोहळा म्हणजे काय?


नरसोबावाडीत कृष्णा नदी उत्तरेकडून येत दक्षिणेकडे वाहत जाते. यावेळी उत्तरेकडून वाहणारे पाणी पादुकांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून मार्गस्थ होते. याचवेळी अनेक भाविक या पवित्र स्नानाचा लाभ घेतात त्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात. 


दत्त मंदिर पाण्याखाली गेल्याने देवस्थान समितीकडून सर्व साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच अन्नछत्रातील भाविकांसाठी मिळणारा महाप्रसाद नदीचे पाणी वर येईपर्यंत सुरू राहणार असल्याचे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले.


आजपासून मुख्य दत्त मंदिरात होणारी महापूजा तसेच अन्य कार्यक्रम श्रींच्या उत्सव मूर्तीवर होणार आहे. पहाटे काकड आरतीपासून शेजारती पर्यंत सर्व देवस्थानचे नित्य कार्यक्रम पूज्य नारायण स्वामी महाराज यांच्या मंदिरातच पार पडणार आहेत. रोज रात्री साडेसात नंतर धूपाआरती तसेच येथील ब्रह्मवृंदांकडून कृष्णा नदीची पूजा व इंदुकोटी स्तोत्रांचे पठण केले जाणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या