CM Eknath Shinde at Kaneri Math : ‘सुमंगलम’ पंचमहाभूत लोकोत्सव (Sumangalam Panchamabhut Mohotsav) देशाला दिशा देणारा उत्सव ठरेल, सेंद्रिय शेतीचा अभ्यास करायला जगभरातील संशोधक सिद्धगिरी येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ 20 ते 26 फेब्रुवारीपर्यंत होणार असून त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे. तयारीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कणेरी मठाचा दौरा केला. 


मुख्यमंत्र्यांनी काडसिद्धेश्वर महाराजांच्या प्राचीन मंदिरात दर्शन घेवून पाहणीला सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 650 एकर परिसरात होणाऱ्या सुमंगलम कार्यक्रम स्थळाला भेट दिली. त्यांनी यावेळी पृथ्वी,जल,अग्नी, वायू आणि आकाश या तत्वांच्या  गॅलरी, मुख्य सभा मंडप सोबत सोळा संस्कार, आरोग्य अशा गॅलरीना भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी सिद्धगिरी गोशाळा, सिद्धगिरी हॉस्पिटल व सिद्धगिरी गुरुकुलमला भेट देत मठाच्या विविध प्रकल्पांची पाहणी केली. त्यांनी मठावर होणाऱ्या लोकोपयोगी प्रकल्पांचे कौतुक केले. सिद्धगिरी गुरुकुलमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर प्राचीन 14 विद्या व 64 कलांचे प्रात्यक्षिक सादर केले. मुख्यमंत्र्यांनी अशा अभिनव शिक्षण पद्धतीची आजच्या पिढीला खरी गरज असल्याचे सांगितले. 


दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक होईल असा सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव


मुख्यमंत्री म्हणाले की, मठाने आजपर्यंत आध्यात्मसह कृषी, पारंपरिक शिक्षण, आरोग्य, महिलासबलीकरण, संस्कृती रक्षण, गोसंवर्धन, संशोधन आणि आपत्ती व्यस्थापन अशा अनेक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पर्यावरण रक्षणासाठी जगाला दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक होईल असा सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित केला आहे. आज पर्यावरणीय हानीच्या अनेक घटना आपण पाहत आहोत. त्सुनामी, अतिवृष्टी, भूकंप, महापूर या सारख्या अनेक समस्याना आज जगाला तोंड द्यावे लागत आहे. यासाठी आपण जागृती करणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेनुसार कोल्हापुरातील सिद्धगिरी मठ येथे सुमंगलम् हा पर्यावरणीय लोकोत्सव होत आहे ही आपल्या राज्यासाठी गौरवाची बाब आहे.


सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव कसा असेल?


या उत्सवाबद्दल बोलताना काडसिद्धेश्वर स्वामी यांनी म्हणाले की, या उत्सवात पारंपरिक सेंद्रिय पद्धतीच्या शेतीचे रोल मॉडेल प्रत्यक्षात पाहता येणार आहे. देशी बियाणे, जैविक खत, जैविक कीड नियंत्रक प्रक्रिया समजून घेता येणार आहेत. त्यामुळे रासायनिक विषमुक्त अन्न-धान्याकडे टाकलेले ते एक समग्र पाऊल ठरेल. तसेच देशात पहिल्यांदाच देशी प्रजातीच्या गाई ,म्हैशी, बकऱ्या, घोडे, गाढव , कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. त्यामुळे देशी जाती प्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होईल. लोकोत्सवात सहभागी होणाऱ्या लोकांना काडसिदेश्वर स्वामी यांनी सोबत एक किलो प्लास्टिक कचरा सोबत आणण्याचे आवाहन केले आहे. येथे गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून रिसायकलिंग युनिटमधून त्या कचऱ्याचे पुनर्निमिती प्रक्रिया लोकांना पाहता येणार आहे. यामुळे समाजातील युवकांना एक नवीन दिशा निश्चितच मिळू शकते. 


इतर महत्वाच्या बातम्या