CM Eknath Shinde in Kolhapur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 11 जून कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. सीएम शिंदे यांची तपोवन मैदानावर भव्य सभा होणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे एक लाख नागरिक सहभागी होतील. यावेळी शासकीय योजनांच्या पन्नास हजार लाभार्थ्यांना पत्राचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी मुख्यमंत्री दौऱ्याच्या नियोजनाची आढावा बैठक घेतली.


या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी क्षीरसागर म्हणाले की, 'कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे एक लाखापेक्षा जास्त नागरिक या सभेत सहभागी होणार असून तपोवन मैदानावरत भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. या मंडपाचे तीन स्वतंत्र्य मंडपात विभाजन केले जाणार आहे. मधल्या मंडपात सभा आणि सुमारे पन्नास हजार लाभार्थ्यांना पत्रांचे वाटप केलं जाणार आहे. उजवीकडील बाजूच्या मंडपामध्ये आरोग्य शिबिर, तर डाव्या बाजूच्या मंडपामध्ये विविध शासकीय योजनांचे स्टॉल असतील. अशा स्वरूपामध्ये ही सभा आयोजित करण्यात आलेली असून या सभेसाठी जिल्ह्यातील बारा तालुक्यांतून पात्र लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील. तसेच या सभेसाठी येणाऱ्या सर्व नागरिकांची जेवणाची व्यवस्था, पार्किंगची सुविधा करण्यात येणार आहे.


संसद भवनाच्या उद्घाटनामुळे पहिला दौरा रद्द


यापूर्वी, 28 मे रोजी मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा नियोजित केला होता. मात्र, संसद भवनाच्या उद्घाटनामुळे तो रद्द करावा लागला होता. यानंतर 5 जूनला मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली होती. मात्र, आता 11 जूनला मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा निश्चित करण्यात आला आहे.


कोल्हापुरात भाजप शिंदे गटासमोर आव्हान 


दुसरीकडे, कोल्हापुरात भाजप आणि शिंदे गटासमोर महाविकास आघाडीचे आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी तगडे आव्हान असणार आहे. विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शिंदे गटात आहेत, तर आमदार प्रकाश आबिटकर, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरही शिंदे गटात आहेत. माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके सुद्धा शिंदे गटात आहेत. तथापि, भाजपची कोल्हापूर जिल्ह्यातील तयारी पाहता दोन्ही खासदार भाजपच्याच चिन्हावर लढण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या