Satej Patil: आम्ही मंजूर करून आणलेल्या निधीत सत्ताधारी आडकाठी घालत आहेत. रस्त्यांसाठी आणलेला निधी बाकडी आणि ओपन जीमसाठी वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही कोल्हापूर शहराच्या (Kolhapur News) विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे. इतरत्र निवडणुका होत आहेत. मात्र महापालिकेच्या निवडणुका घेण्यास सरकार घाबरत असल्याचा  हल्लाबोल  माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी केला. कोल्हापूर शहरातील न्यू शाहूपुरी व नागाळा पार्क प्रभागामधील रस्ते कामाचा प्रारंभ करताना सतेज पाटील बोलत होते. यावेळी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. पाटील म्हणाले की, मंजूर केलेली विकासकामे करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जुना मंजूर निधी दुसरीकडे वळवला जात आहे. यातून 40 टक्क्यांचा कर्नाटकी पॅटर्न कोल्हापुरात येऊ पाहत आहे. 


यावेळी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, माजी महापौर संजय मोहिते, राजेश लाटकर, संजय घाडगे, दिपाली राजेश घाडगे, तनुजा संजय घाडगे, प्रसाद कामत, दिलीप बनसोडे, विक्रम गवळी, महेश गवळी, सुनील भांडवले, दिलीप शिर्के, बशीर खाणजादे, मंगेश भोसले, वासीम मुजावर, चंद्रकांत राऊत, मनोहर माने आदी उपस्थित होते.


विविध विकासकामांचा शुभारंभ 


दरम्यान, रंकाळा तलाव प्रभाग क्रमांक 71 येथील हरिओम नगर मध्ये 70 लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येत असलेल्या विकास कामाचा शुभारंभ सतेड पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महापालिका प्रभाग क्रमांक 12 मधील पाटील वाडा ते राजहंस प्रिंटिंग प्रेस या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार जयश्री जाधव यांच्या उपस्थित केला. तसेच अंबाबाई मंदिर परिसर, वसंत मेडिकल ते बाबुजमाल, जैन मंदिर कपिलतीर्थ मार्केट गुजरी कॉर्नर, रंकाळा स्टँड परिसरात 1 कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या रस्ते डांबरीकरण कामाचाही शुभारंभ करण्यात आला.


अन्यथा स्वतः झूम येथे थांबून कचऱ्याची वाहने रोखणार


दुसरीकडे, गेल्या अनेक दिवसांपासून आग लागून धुमसत असलेल्या कसबा बावड्यातील झूम कचरा प्रकल्पावरून आमदार सतेज पाटील यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी लागलेली आग तातडीने आटोक्यात आणावी. तसेच केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करा, अन्यथा या ठिकाणी कचरा टाकायचा बंद न केल्यास स्वतः थांबून कचऱ्याची वाहने रोखणार असल्याचा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे. आज 29 मे रोजी पुन्हा झूम प्रकल्पाची पाहणी करून मंगळवारी महापालिका प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे यांच्यासोबत आढावा बैठक घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या