कोल्हापूर : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) पावसाने पूर्णत: उघडीप दिल्याने पिके संकटात सापडली आहेत. गेल्या आठवडापासून उन्हाळ्याप्रमाणे ऊन जाणवू लागलं आहे. त्यामुळे शेतजमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. विशेष करून माळरानावरील सोयाबीन, भूईमुग पीक संकटात आहे. रोप लावलेल्या भाताची सुद्धा परिस्थिती सारखीच असल्याने पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम पावसाची गरज आहे. 


रोप लावण पावसाने दडी मारल्याने संकटात


जून महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर जूलै महिन्यात झालेल्या दमदार पावसाने आधार मिळाला. त्याचबरोबर दोबार पेरणीचे संकट मागे टळले. दमदार पावसाने धरणांनी तळ गाठून सुद्धा समाधानकारक भरली गेली आहेत. नद्यांची पूर पातळी ओसरून सामान्य झाली आहे. जुलै महिन्यातील पावसाने पिकांना चांगला बहर आला आहे. त्यामुळे  ऑगस्ट महिन्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा झाला असता, तरी मोठी अडचण येणार नव्हती. मात्र, पूर्णत: उघडीप दिल्याने परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड तालुक्यात भात पिकाची रोप लावण केली जाते. जुलैच्या मध्यावधीनंतर रोप लावणीला वेग आला होता. मात्र, रोप लावण पावसाने दडी मारल्याने संकटात आहे. 


माळरानावरील पिकांना पावसाची गरज 


कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सर्वाधिक फटका माळरानावरील पिकांना बसत आहे. पाण्याचा निचरा तातडीने होत असल्याने ओलावा कमी होऊन जमिनी भेगाळू लागल्या आहेत. काही ठिकाणी जमिनी भेगाळण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे आगार असलेल्या राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्यात दमदार पाऊस झाला असला, तरी कोल्हापूर शहर हातकणंगले, शिरोळ, कागल तालुक्यात यंदा अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे पंचगंगा नदी अनेक दिवस पात्राबाहेर राहूनही धोका पातळी गाठू शकली नाही. राधानगरी धरण भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने पूर येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पावसाचा जोर नसल्याने त्याचा परिणाम झाला नाही. धरणांमध्ये पाणीसाठा झाल्याने ऑगस्टमध्ये संभाव्य पुराची धोका सुद्धा जिल्ह्यावरील टळला आहे. 


गेल्या आठवडाभरापासून उन्हाचा पारा वाढला 


कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवडापासून अधूनमधून येणाऱ्या सरीही गायब झाल्याने वातावरणातही उष्मा जाणवून लागला आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटसारखी परिस्थिती ऑगस्ट महिन्यामध्ये दिसून आली होती. मागील आठवड्यात पारा 29 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या