Birdev Done : इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते. जर तुमच्या मनात दृढ इच्छा असेल, तर तुम्ही यश मिळवू शकता. पण त्यासाठी दृढ संकल्प आणि ध्येयपूर्तीसाठी कठोरपणे काम करण्याची तयारी लागते. याचचं एक उदाहरण म्हणजे बिरदेव सिध्दाप्पा डोणे (रा. यमगे ता. कागल. जि. कोल्हापूर). वडील मेंढपाळ, घरात कोणतीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक. पहिल्यापासूनच अधिकारी होणाचे स्वप्न होते अन् अखेर बिरदेव सिध्दाप्पा डोणे (रा. यमगे ता. कागल. जि. कोल्हापूर) या मेंढपाळाच्या मुलाने ते पुर्ण केले. बिरदेव यांनी मिळवलेलं हे यश समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात बिरदेव याने देशात 551 वी रँक मिळवली आहे. निकाल समोर आला त्यावेळी बिरदेव आपल्या आई वडील यांच्यासह बेळगाव परिसरामध्ये बकरी चारण्यासाठी गेला होता.

बालपण डोंगर दर्‍यांमध्ये मेंढ्या चारण्यात गेलं

बिरदेव सिध्दाप्पा डोणे याचं बालपण डोंगरदर्‍यांमध्ये मेंढ्या चारत, कधी उघड्यावर अभ्यास करत करण्यात गेलं. मेंढ्या पाळण्यात आणि त्यांचा सांभाळ करण्यात देखील मोठी आव्हानं आहेत आणि त्यापेक्षा मोठं काहीकरी केलं पाहिजे यासाठी त्याने मेहनत घेतली, स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यायची आणि गावकऱ्यांचा अभिमान वाटावा असं काहीतरी घडवायचं आणि आपल्या माणसांच्या समाधानासाठी काहीतरी करायचं असं त्याने ठरवलं होतं. गावातील शाळेत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दोन खोलीचं घर अभ्यास करायला जागा नसल्याने गावातील मराठी शाळेचा व्हरांड्यात तो अभ्यास करायचा.

तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यश

सुरवातीपासून स्पर्धा परीक्षेचे वेड असल्याने त्याने सुरवातीस दोन वर्षे दिल्ली मध्ये जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC ) परीक्षेची तयारी करत होता. त्यानंतर तो पुन्हा पुण्यात आला. तिथे सदाशिव पेठेमध्ये अभ्यास करू लागला. त्याने आता पर्यंत दोन वेळा ही परीक्षा दिली होती पण त्याला यशाने हुलकावणी दिली होती. पण जिद्दीने त्याने मागील वर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि यामध्ये उज्वल यश मिळवत त्याने देशात 551 वी रँक मिळवली.

बिरदेव डोणे यानी मिळालेल्या यशावर काय म्हटलं?

धनगर असल्यामुळे आम्ही या गावावरून त्या गावावरून फिरत असतो. बकऱ्या चालत या गावावरून त्या गावावर जातो. रिझल्ट आल्यानंतर रिझल्ट पाहून भारी वाटलं. धनगराचा मुलगा पण इतक्या उंच शिखरावरती जाऊ शकतो. प्रयत्न जिद्द चिकाटी वगैरे असेल तर आपण आपण यशाला गवसनी घालू शकतो. मला भारी वाटतंय. आनंद झाला आहे. मला 551 वा रँक मिळाला आहे. मेंढपाळाचा मुलगा असल्यामुळे अभ्यास करताना थोडा त्रास झाला. पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आणि अभ्यासाप्रती ओढ असल्यामुळे मार्ग सुखकर होत गेले. बकरी राखण्याचं जे कष्ट आहे त्यापेक्षा तरी अभ्यास चांगला वाटत होता. बकरी राखणं आता सोपे राहिले नाही. हा व्यवसाय आता सोपा नाही. कामासाठी गडी मिळत नाहीत. शेतकरी पण मेंढपाळांना शेताच्या बांधावर येऊ देत नाहीत. त्यामुळे व्यवसाय करणं खूप अडचणीचा बनला आहे. त्यापेक्षा शिक्षण किंवा चांगली काही नोकरी मिळून स्थैर्य मिळवणं खूप गरजेचे आहे असं वाटत होतं. या मिळालेल्या यशाच्या आधारे मी माझ्या आई-वडिलांचे आणि घरातल्यांची काळजी घेऊ शकत होतो. आयुष्यात स्थैर्य मिळवण्याचा मी प्रयत्न केला, त्यानंतर मी अभ्यास करून हे यश मिळवण्याचा स्वप्न पाहिलं ते मिळवलं असंही पुढे  बिरदेव डोणे यानी म्हटलं आहे. 

रिझल्ट लागल्यानंतर सगळंच वेगळं वातावरण झालं होतं. एका मेंढपाळाचा मुलगा इतक्या चांगल्या रँकने येऊ शकतो आणि अधिकारी बनू शकतो हे पाहून सर्वांनाच भारी वाटत होतं. किती वाईट परिस्थिती स्वतःवर आली तरी जिद्द चिकाटी आणि धैर्य असेल तर त्या आधारे तुम्ही किती परिस्थिती अवघड असेल तर त्यावर मात करून चांगल्या परिस्थिती निर्माण करू शकता. त्यानुसार तुम्ही तुमची वाईट परिस्थिती देखील बदलू शकता, असंही त्याने म्हटलं आहे. 

रोहित पवारांनी केलं कौतुक

माळरानातला #हिरा महाराष्ट्राचं मन जिंकलस बिरदेवा तू...!यमगे (ता. कागल) येथील बिरदेव सिद्धप्पा डोणे या मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या तरुणाने #UPSC परीक्षेत मिळवलेलं यश हे खऱ्या अर्थाने डोळे दिपवणारं असं नेत्रदीपक आहे... आज मेंढरं राखणारा बिरदेव उद्या अधिकारी म्हणून इतरांसोबतच याच मेंढपाळ बांधवांसाठीही पॉलिसी आखणार आहे.. त्यासाठी त्याला मनापासून शुभेच्छा!!!