Kolhapur News : घरात लाकडी जिन्याला बांधलेल्या पट्ट्यांपासून बनवलेल्या झोपाळ्यावर खेळत असताना गळफास लागून समर्थ अरुण वरुटे (9, रा. आरे, ता. करवीर) या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (दि. 23) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, समर्थ अरुण वरुटे हा आरे येथील विद्यामंदिर शाळेत चौथीमध्ये शिकत होता. त्याच्या शाळेच्या परीक्षा सुरू होत्या आणि बुधवारी सकाळी अकरा वाजता तो पेपर देऊन घरी आला होता. त्याचे वडील अरुण यांचे किराणा दुकान असून दुपारी ते दुकानात गेले होते. त्याच वेळी समर्थची आई, चुलती व चुलते शेतात काम करत होते. घरात फक्त समर्थ आणि त्याचा भाऊ अथर्व (13) हे दोघेच होते.
गळफास लागून दुर्दैवी मृत्यू
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अथर्व दूध आणण्यासाठी बाहेर गेला. तेव्हा समर्थ घरात झोपाळ्यावर खेळत होता. घरातील लाकडी जिन्याला पट्ट्या बांधून झोपाळा तयार करण्यात आला होता. समर्थ खेळत असताना त्या झोपाळ्याचा पट्टा त्याच्या गळ्यात अडकला आणि गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अथर्व घरी परतल्यावर त्याने ही दृश्ये पाहिली आणि आरडाओरड करत बाहेर धावला. आवाज ऐकून कुटुंबीय धावत आले व त्यांनी तत्काळ समर्थला सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
तर कदाचित चिमुकला बचावला असता
दरम्यान, समर्थला मांजरांवर खूप प्रेम होते. त्याचं मांजर आजारी होतं आणि काही खाणं-पिणं बंद झालं होतं. त्यामुळे त्यासाठी चिकन आणण्यासाठी तो पैसे साठवत होता. त्याने चिकन घेण्यासाठी पैसेही काढून ठेवले होते. अथर्वने त्याला सोबत यायला सांगितलं होतं, पण समर्थ म्हणाला, थोडा वेळ खेळून येतो. जर तो भावासोबत गेला असता, तर कदाचित हा जीव वाचू शकला असता, अशी चर्चा आता परिसरात होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या