Hasan Mushrif : ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर आता 11 एप्रिलला फैसला होणार आहे. मुंबईतील विशेष न्यायालय हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनवर निर्णय 11 एप्रिलला जाहीर करणार आहे. त्यामुळे ईडी प्रकरणात तोपर्यंत मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम असेल. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने हे निर्देश दिले आहेत. दरम्यान, मुश्रीफ यांना दोन आठवड्यांसाठी संरक्षण दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते.  


ईडीने न्यायालयात काय दावा केला? 


ईडीकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, "मुश्रीफ यांनी तपासात सहकार्य केलेलं नाही आणि तीन समन्स बजावूनही ते हजर झाले नाहीत आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरच हजर झाले. त्यांची चौकशी कोल्हापुरात नोंदवलेला एफआयआर आणि कंपनी रजिस्ट्रारने दाखल केलेल्या तक्रारीवर आधारित आहे." सरसेनापती संताजी शुगर घोरपडे साखर कारखाना लिमिटेडचे शेअर्सच्या रुपात शेतकर्‍यांकडून 10 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. 2011 मध्ये लोकसहभागातून साखर कारखाना उभारण्यासाठी निधी उभारताना मुश्रीफ यांना भांडवलाची गरज असल्याचा दावा ईडीने केला आहे. 


हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ सुरुच


दुसरीकडे, मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ सुरुच आहेत. त्यांच्याविरोधात आणखी 67 शेतकऱ्यांनी कोल्हापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे तक्रार दाखल केल्याने आतापर्यंत दाखल झालेल्या तक्रारींची संख्या 108 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुश्रीफांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सभासदत्व देतो, असे सांगून फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांच्यावर केला आहे. याप्रकरणी 2 एप्रिल रोजी आणखी 67 शेतकऱ्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे तक्रार केली. मुश्रीफ यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला आहे.


कोल्हापुरातील दाखल गुन्ह्यात 24 एप्रिलपर्यंत दिलासा 


कोल्हापुरातील दाखल गुन्ह्यात मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणात 24 एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढील सुनावणी येईपर्यंत आता तक्रारदार शेतकऱ्यांची संख्या 108 वर गेली आहे. 


पी. एन. पाटील स्वतः ईडी कार्यालयात दाखल 


दुसरीकडे, आज आमदार पी. एन. पाटील स्वतः ईडी कार्यालयात दाखल झाले. आमदार पी. एन. पाटील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. तथापि, त्यांची चौकशी होऊ शकली नाही. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि गडहिंग्लज तालुक्यातील अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना (गोडसाखर) कर्जपुरवठा प्रकरणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (KDCC ED Raid) ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. या संदर्भात आतापर्यंत ईडीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या मुश्रीफ यांच्यावर तीन वेळा छापेमारी करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाच अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. तसेच तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील सुद्धा ईडीच्या रडारवर आले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या