Bhagwat Karad in Kolhapur : मोदी हे सर्वांचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकेरी शब्द वापरायला नको होते. संजय राऊत यांची रोजची बडबड ऐकून जनता वैतागली आहे, महिलाही ते दिसताच टीव्ही बंद करा म्हणतात, अशी टीका शब्दात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली आहे. शिंदे गट आणि भाजप एकजीव युती असून शिंदे गट भाजपकडे कोणत्या खुर्चीसाठी आलेला नाही, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला. कोणत्याही नेता आमच्याकडे आल्यानंतर आम्ही विचारानुसार बदलतो, नारायण राणे हे उत्तम उदाहरण असल्याचेही भागवत कराड म्हणाले. 


शिंदे गट भाजपकडे कोणत्या खुर्चीसाठी आलेला नाही


विविध कार्यक्रमांसाठी मंत्री कराड कोल्हापुरात (Kolhapur News) आले होते. त्यांनी मंगळवारी अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, खासदार संजय राऊत यांची रोजची बडबड ऐकून जनता वैतागली आहे. ते दिसताच महिलांही आता टीव्ही बंद करा म्हणतात. शिंदे व भाजप एकजीव युती आहे. शिंदे गट भाजपकडे कोणत्या खुर्चीसाठी आलेला नाही तर उद्धव ठाकरे हे खुर्चीसाठी सेना आणि हिंदुत्व सोडून गेले. शिंदे आणि भाजपची युती येणाऱ्या निवडणुकीतही कायम असेल.


शेजारच्या देशांची आर्थिक परिस्थिती खराब असून प्रचंड महागाई आहे. तुलनेने भारतामध्ये महागाई फारच कमी आहे. पंतप्रधान मोदींनी देश विकसनशील केला असून अर्थव्यवस्था भक्कम असल्याचेही कराड म्हणाले. भागवत कराड यांच्या हस्ते राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँक लि.कागल बँकेच्या मुरगूड शाखेचे उद्घघाटन करण्यात आले. कराड म्हणाले की, देशात गुंतवणुकीसाठी जगभरातील उद्योजक उत्सुक आहेत. पंतप्रधान मोदींनी जगाला विश्वास दिला आहे. देशाची आर्थिक प्रगती सुरु असून डिजिटल क्रांती झाली आहे. देश महासत्ता बनण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास गरजेचा आहे.


भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येईल की नाही हा वरच्या पातळीवरीचा प्रश्न आहे. मात्र, भाजपचे एक प्रिन्सिपल आहे जो येतो त्याचे स्वागत करून आम्ही आमच्या विचारानुसार घडवतो. आम्ही सत्तेसाठी, खुर्चीसाठी विचार बदलत नाही. कोणत्याही पक्षाचा आमच्यात आला तर आम्ही त्यांना आमच्या विचारानुसार बदलतो, केंद्रीय मंत्री नारायण राणे याचे उत्तम उदाहरण आहे, असेही डॉ. कराड यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या