Kolhapur Bandh: शिवराज्यभिषेक दिनी कोल्हापुरात (Kolhapur News) सात तरुणांनी आक्षेपार्ह व्हाॅट्सअॅप स्टेट्स ठेवल्याने संतप्त पडसाद उमटले. या घटनेनंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक सबंधित तरुणांविरोधात कारवाई  करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या धरला. ठिय्या धरल्यानंतर कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी, सीपीआर आणि दसरा चौकात दगडफेकीचे प्रकार घडले. यानंतर पोलिसांनी बळाचा तरुणांना पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. मंगळवारी (6 जून) दुपारी झालेला हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरु होता. 


शिवराज्याभिषेक दिनी झालेल्या या प्रकारानंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आज (7 जून) कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. हिंदुत्ववादी संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमणार आहेत. शिवाजी चौकात एकत्र आल्यानंतर महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करुन ध्येय मंत्र म्हटला जाणार आहे. यानंतर शहरातील बाजारपेठांमधून मोर्चा काढून बंदचे आवाहन करण्यात येणार आहे, तरी सर्वांनी शिस्तीचे पालन करावे, कोणालाही दमदाटी करु नये, आक्षेपार्ह घोषणा देऊ नये, हात जोडून व्यवहार बंद करण्याची विनंती करावी, असे आवाहन बंडा साळोखे यांनी केलं आहे. 


तर कारवाई होणारच, पोलीस अधीक्षकांचा इशारा 


दरम्यान, पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी कोणत्याही ओळखीची गरज नाही, तक्रार घेतली नसल्यास त्याचे उत्तरदायित्व माझे असेल. जो कायदा मोडेल, त्याच्यावर कारवाई होणारच, कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी बंद मागे घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे. विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीसाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 


कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत बंदी आदेश 


दुसरीकडे, आक्षेपार्ह स्टेटस लावण्यावरुन निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना रात्री दिला आहे. पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होऊन वा स्टेटसमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकतो. अहवालानुसार अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी 19 जूनच्या रात्री बारापर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जादा लोक एकत्र जमा होणे, जमाव जमवणे, मिरवणुका काढणे, सभा घेण्यास बंदी आहे. तसेच लाठ्या, काठ्या वा शारीरिक इजा करतील अशा वस्तू, दगड, प्रतिमांचे प्रदर्शन, आवेशपूर्ण भाषणे, हावभाव करणे आदी प्रकारांना मनाई केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या