Weather Today Updates: राष्ट्रीय राजधानीसह देशातील बहुतांश राज्यांमध्ये जूनच्या सुरुवातीपासूनच हवामानात सातत्यानं बदल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानंतर वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारपासून (8 जून) वातावरणातील उष्मा वाढणार आहे. तसेच, बुधवारी (7 जून) हवामान विभागानं अनेक ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. 


मान्सून (Monsoon) लांबणार आहे, एवढंच नाही तर बिहार आणि पश्चिम बंगालसह सहा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस घामाच्या धारा सहन कराव्या लागणार आहेत. अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळाचा (Cyclone) मान्सूनवर परिणाम झाला असल्याचंही हवामान विभागानं सांगितलं आहे. 


केरळात मान्सून कधी येणार? 


मान्सून केरळच्या किनारपट्टीवर कधी दाखल होईल, याबाबत अनिश्चितता आहे. अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Biparjoy Cyclone) केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्यास थोडा विलंब होणार आहे. त्यातच अनेक राज्यांत पुन्हा उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. 7 ते 9 जूनदरम्यान विदर्भ आणि पूर्व उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर काही भागांत उष्माही वाढणार आहे. पुणे, मुंबईत मुसळधार पाऊस पडू शकतो. जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता विभागानं वर्तविली आहे. तसेच, बुधवारी (7 जून) दिल्लीत कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. याशिवाय ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आकडेवारीनुसार, 8 जून रोजी तापमान 40 अंश सेल्सिअस आणि 12 जूनपर्यंत 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 


उष्णतेची लाट कायम राहणार 


IMD नुसार, बिहारमधील काही भाग, पश्चिम बंगाल, पूर्व झारखंड, आंध्र प्रदेश, यानम आणि तेलंगणामधील काही भागांमध्ये उष्णतेची लाट 10 जूनपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच, उत्तर प्रदेशात 8 जूनपासून उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. विभागाच्या बुलेटिननुसार, पुढील 5 दिवसांत केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. राजस्थानच्या बिकानेर, जैसलमेर, जोधपूर, पाली, उदयपूर, चित्तोडगडमध्ये जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विभागानं या भागात यलो अलर्ट जारी केला आहे. 


येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रातील पुणे, मुंबईत मुसळधार पाऊस पडू शकतो. जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता विभागानं वर्तविली आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशच्या अनेक भागात आज हलक्या पावसाची शक्यता आहे.