कोल्हापूरच्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीतील श्री दत्त महाराजांवर तेंडुलकर कुटुंबियांची प्रचंड श्रद्धा आहे. आज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर श्री दत्त महाराजांच्या दर्शनाला नृसिंहवाडी इथं पोहचला. मुंबई इंडियन्स संघाचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर तातडीने अर्जुन श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झाला. याआधी देखील सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) हे दोघेही पिता-पुत्र दर्शनाला आले होते.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे मे महिन्यातील उन्हाळाच्या सुट्टीत दत्त मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक येथून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. उन्हाची तीव्रता देखील मोठ्या प्रमाणात आहे. दत्त देवस्थान समितीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तसचे भाविकांसाठी कापडी मंडप देखील उभारण्यात आले आहेत.
अर्जुनची IPL कारकीर्द कशी राहिली?
अर्जुन तेंडुलकरला 2021 मध्ये आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांना त्यांच्या संघात समावेश केला होता. पण अर्जुनला दुखापत झाली आणि त्यामुळे तो संपूर्ण हंगामाला मुकला. त्याच्या जागी सिमरजीत सिंगला संघात संधी मिळाली. यानंतर मुंबई इंडियन्सने 2022 च्या लिलावात 30 लाखांत त्याला पुन्हा घेतले. अर्जुनने 16 एप्रिल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पदार्पण केले. अर्जुनने या सामन्यात 2 षटकांत 17 धावा दिल्या होत्या. मुंबई इंडियन्सने गेल्या तीन वर्षांत एकूण 44 सामने खेळले आहेत. यामध्ये अर्जुनला केवळ 5 सामन्यात संधी मिळाली.