Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना 26 जानेवारी रोजीच्या ग्रामसभेत जलजीवन मिशनच्या (Jaljeevan Mission) अनुषंगाने पाणी व स्वच्छता या प्रमुख घटकांवर ग्रामस्थांमध्ये जनजागृती करावी, तसेच ग्रामस्तरावरील सर्व विकास योजनांच्या माहितीबाबत ग्रामसभेत ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

'हर घर नल से जल' या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी प्रयत्नांचा एक भाग म्हणून विविध स्तरावर व्यापक प्रचार, प्रसिध्दी देण्याचे काम सुरु आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये 'जल जीवन मिशन' संदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे. ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करुन विशेष स्थान देण्यात येवून व समिती सदस्यांची ओळख तसेच त्यांचे अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थित ग्रामस्थांना अवगत करण्यात येणार आहे.

पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणांतर्गत पाणी गुणवत्ता चाचणीसाठी प्रशिक्षीत करण्यात आलेल्या 5 महिलांना या सभेस आमंत्रित करुन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गावातील पाणी गुणवत्ता प्रशिक्षित महिलांची संपर्क क्रमांकासहीत नावे गावातील सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ग्रामसभेत क्षेत्रीय तपासणी संच, (FTK) संचातून पाणी नमुना तपासणीचे प्रात्यक्ष‍िक आरोग्य सेवक व जलसुरक्षा मार्फत करण्यात येणार आहे. तसेच ग्रामसभेत क्षेत्रिय तपासणी संच (FTK) च्या माध्यमातून महिलांद्वारे स्त्रोतांची तपासणी व नळ जोडणीव्दारे येणाऱ्या पाण्याच्या नियमित तपासणीबाबतच्या कार्यपध्दतीची माहिती ग्रामसभेमध्ये देण्यात येणार आहे.

ग्रामसभेदरम्यान जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर योजनेची सविस्तर माहिती जसे योजनेचे उद्दिष्ट, योजनेतील समाविष्ट उपांगे, मंजुर निविदेची रक्कम, योजनेचा कालावधी, कंत्राटदारांचे नाव, नळ जोडणीची सद्यस्थिती इ. तसेच प्रगतीत असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची माहिती देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत गावातील पाणी पुरवठा सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक जमा करावयाचा समुदायाचा वाटा (लोकवर्गणी 10 टक्के), जमा झालेली रक्कम व उर्वरित जमा करावयाची रक्कम याबाबत आवश्यक कृती योजना आखण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी योजनेची भौतिक कामे अंतिम टप्प्यात आहेत अशी गावे हर घर नल से जल" म्हणून घोषित करण्यात येणार आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या