Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आगामी निवडणुकीवरून भाष्य केलं आहे. कागलमध्ये (Kagal) महामेळाव्यात हसन मुश्रीफ यांच्या हस्ते 16000 वैद्यकीय विमा सुरक्षा कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय वाटचालीवर भाष्य केले.
हसन मुश्रीफ म्हणाले की, कागल विधानसभा मतदारसंघातून अजून दोनवेळा निवडणूक लढवणार आहे, त्यानंतर लोकसभा निवडणूक लढवून केंद्रात मंत्री होणार आहे. ते पुढे म्हणाले की, श्रीमंत आणि गरीबांमधील दरी रुंदावत चालली आहे. गरिबांची सेवा गेल्या 30 वर्षापासून अखंडपणे आम्ही करत आलो आहे. गरिबांशी माझी नाळ तुटलेली नाही. विधानसभेच्या आणखी दोन निवडणुकीत विजयी होणार आहे आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक लढवून केंद्रात मंत्री देखील होणार आहे. लोकांची शक्ती जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत कोणालाही घाबरत नाही. ज्या ज्या शासकीय योजना आहेत, त्या गरीबांसाठी राबवण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.
हेमांडपंथी अंबाबाई मंदिराने मुरगूडच्या वैभवात भर
दरम्यान, मुरगुड ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक पुण्यनगरी आहे. या शहराच्या वैभवात भर टाकणारे ग्रामदैवत अंबाबाई मंदिर पूर्णत्वाला गेले ही शहरवासीयांसाठी सुखद गोष्ट आहे. या मंदिरासाठी मागेल तितका निधी आपण दिला आहे. यापुढेही लागेल तितका निधी देऊ, अशी ग्वाही हसन मुश्रीफ यांनी रविवारी दिली. ते म्हणाले, लोकवर्गणी आणि सरकारी निधी यातून हे मंदिर शिल्पकलेच्या कोरीव दगडी लेण्यासारखे आहे. जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या नकाशावर हे मंदिर एक सुंदर तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध होईल. या मंदिराच्या बांधकामामध्ये मंत्रीपदाच्या काळात पर्यटन विकास आणि तीर्थस्थळ विकास योजनेतून अडीच कोटीहून अधिक निधी आणू शकलो, याचे आत्मिक समाधान आहे.
गोकुळ लेखापरीक्षणावर हसन मुश्रीफ म्हणतात...
दरम्यान 'गोकुळ'मध्ये (Gokul) चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी निर्णयाचे स्वागत असल्याचे म्हटले आहे. मुश्रीफ पुढे म्हणाले, गोकुळमध्ये खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, यांच्या गटाचे संचालक असतानाही गोकुळमध्ये चाचणी लेखापरीक्षण लागत असल्यास त्या निर्णयाचे स्वागत आहे. मुश्रीफ पुढे म्हणाले की, गोकुळ निवडणुकीत दूध दरात दोन रुपयाची दरवाढ करू अशी आम्ही घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात आठ रुपये दरवाढ देण्यात आली आहे. प्रति लिटरला चारपट दरवाढ देण्यात आली.
गेल्या दीड वर्षांपासून अतिशय काटकसरीने आणि पारदर्शक कारभार सुरू आहे. गोकुळमधील उपपदार्थांमध्ये फायदा होत नव्हता. सध्या मात्र कोट्यवधी रुपयांचा फायदा होत आहे. खर्चावर सर्व बाजूंनी मर्यादा घालण्यात आली आहे. पारदर्शी आणि काटकसरीने संघ फायद्यात आल्याचे दिसून येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या