Kolhapur Bajar Samiti Election : नुकत्याच पार पडलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने सभासदांनी चिट्ट्यांच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला होता, तोच सिलसिला कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये दिसून आला. कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांकडून सर्वच सत्ताधारी कारभाऱ्यांना जिव्हारी लागणाऱ्या कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही भाजप सांभाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीने विजयी झेंडा फडकवला असला, तरी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावना मात्र चांगल्याच लक्षवेधी ठरल्या आहेत. राजकीय नेत्यांच्या नातलगांच्या उमेदवारीवरून कार्यकर्त्यांनी थेट आपल्या कारभाऱ्यांचे कान टोचले आहेत.
नजर टाकूया मतपेटीमध्ये मिळालेल्या चिट्ट्यांवर
सर्व पत्रकारांनी मीडिया बंधू माझा तुम्हाला साष्टांग नमस्कार
- शेतकरी अन्नदाताचे मनोगत जनतेचा नेता कसा असावा जो एका पक्षाचा एकनिष्ठ असावा आणि ज्या आघाडीमध्ये निवडून आला त्या आघाडीमध्ये राहा. गुवाहाटीला जाणारा नसावा. ईडीचे राजकारण करण्यापेक्षा अन्नदाता शेतकरी यांच्या विकासाची कामे करा अन्नदाताचे गुऱ्हाळ घरे बंद पडत आहेत यासाठी उपाय करा. अन्नदाताच्या बांधावर जाऊन पीक वाढीसाठी सल्ला द्यावा आणि अन्नदाता जिवंत ठेवावा आणि तसेच अन्नदाताच्या मुलांचे लग्न होत नाही त्यासाठी उपाय करावा ही विनंती.
- स्वार्थासाठी नेते करतात निवडणुकीत गट्टी शेतकरी हितासाठी लढतात फक्त राजू शेट्टी
आमदार विनय कोरे सावकार
- मित्रहो आपण कोल्हापूर बाजार समिती निवडणूक उमेदवार आहात. आपण सर्वजण निवडून आला आहात. पण नेतेमंडळीना विश्वासात घेऊन काम करावं आपण आपली मुलं न भरता शेतकरी यांच्या मुलांची कामगार भरती करा व शेतकरी कुटुंबावर भर द्या.
- माननीय सावकार साहेब बड्या धेंड्यांना आणि दारू दुकानदारांना बाजार समिती तिकीट द्या, पद पण त्यांना द्या आणि कॉन्ट्रॅक्ट घ्यायला रोज सकाळी तुमच्या दाराला येणार, मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं, तुमच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी काय करायचं.
- सावकर, पी. एन. पाटील साहेब हिशोब चुकता होणार, राजाराम कारखाना
- विनय कोरे साहेब आपण एक स्वच्छ प्रतिमा असणारे राजकीय व्यक्तिमत्व आहात पण आपली भूमिका प्रत्येक निवडणुकीमध्ये बदलणारी अशी झाली आहे. त्यामुळे तुमच्याबाबत असणारा विश्वास लोकांच्यात राहिलेला नाही. राजाराम कारखानाला ज्यांच्या सोबत तुम्ही होता त्यांना तुम्हीच आता विरोध करताय तुमची भूमिका नेमकी कोणती?
आमदार सतेज पाटील यांच्यासाठी
- मतदार राजा जागा हो : हा छत्रपती शाहूंचा कोल्हापूर जिल्हा, नेतेमंडळी जास्त कार्यकर्त्यांना महत्त्व देत नाहीत. कारभाऱ्यांना महत्त्व देतात. नेते मंडळी मांडीला मांडी लावून बसतात लोकप्रतिनिधी शड्डू ठोकतात. कार्यकर्त्यांना भडकवतात, त्यांचे घर उध्वस्त करतात. एक दिवस यांचे कंडके पडतील, तुमच्यात हिंमत असेल तर खासबाग मैदान रिकामे आहे तिथे ठेवा की कुस्ती, जिल्ह्याने काय आदर्श घ्यावयाच्या सगळे स्वार्थी आहेत, म्हणे संसदरत्न? धन्यवाद
- नमस्कार माननीय श्री बंटी साहेब आणि ऋतुराज दादा, मी तुमचा कार्यकर्ता आहे, मला तुमच्या कामाबद्दल आधार आहे. परंतु, दोन नंबर फळी आहे ती बरोबर नाही पीए हे सुद्धा बरोबर नाहीत. चहा पेक्षा किटली गरम आहे. आपला सामान्य कार्यकर्ता, काल पण तुमचा, आज पण तुमचा आणि उद्याही तुमचा, मीडियाला चिट्टी द्या.
- बंटी साहेब आपण चुकलात, उमेदवारी देताना, तुम्ही फक्त पाहुणे बघा. डी. वाय. पाटील कारखाना वैजयंती पाटील, गोकुळ शशिकांत पाटील, मार्केट कमिटी सुयोग चौगुले (वाडकर) आता राहिला बिद्री कारखाना त्यात प्रताप पाटील कावणेकर यांना गटात घ्या आणि तिकीट द्या म्हणजे पाहुणे वलय पूर्ण होईल बाकी सामान्य कार्यकर्ते 14 ते 15 वर्ष आहेतच पोस्टर, जाहिराती, लावून प्रचार करण्यासाठी.
- बंटी पाटील साहेब विनय कोरे यांचा नाद सोडा. सर्वात घातकी माणूस. विनय कोरे 2024 ला पाणी पाजा.
- बंटी साहेब सहकार पीएला आवर घाला, एक भाचा कारखान्यात पर्मनंट, दुसरा भाचा कोट रुपयाची कामे, मेव्हणा बँकेत आणि कार्यकर्ता फक्त मतदानासाठी कसा येईल
- बंटी साहेब सावधान साहेब दक्षिण मतदारसंघातील आपले कारभारी बाबासाहेब चौगुले व शशिकांत खोत यांचा वाढता हस्तक्षेप थांबवा नाही तर आपल्यावर 2014 सारखी नामुष्की नको. आणि साहेब जरा शहर सोडून बाकीची 38 गावे आहेत तेथील कार्यकर्ते तोंड दाबून बुक्क्यांचा मार खातो आहे. नवीन आलेले कार्यकर्ते जरा थांबवा आणि 2001 पासून आपल्या सोबत जी लोकं होते त्यांना विचारात घ्या. 38 गावांमध्ये लक्ष द्या त्या 38 गावांमधील जुन्या कार्यकर्त्यांची मीटिंग घ्या साहेब जुनं ते सोनं.
प्रकाश आबिटकर आणि के. पी. पाटील
- बाजार समिती निवडणूक प्रकाश आबिटकर आणि के. पी. पाटील यांच्यातील नेमका गद्दार कोण हेच आम्हाला समजत नाही येथून पुढच्या निवडणुकीत दोघांनाही उत्तर मिळेल!
पी. एन. पाटील
- पी. एन. साहेब करवीर तालुका सोडून काँग्रेससाठी राधानगरी तालुका याचे भान असू द्या. अशांमुळे राधानगरी काँग्रेसची अशी अवस्था होत आहे. आता इथून पुढे तरी विचार करा
के. पी. पाटील
- के पी साहेबांवर आहे जनता नाराज, त्यामुळे जनतेला हवा आहे नवा चेहरा, जनतेच्या मनातील आमदार ए. वाय.
इतर महत्वाच्या बातम्या