कोल्हापूर : आमदार अपात्रता प्रकरणात (Shiv Sena MLA Disqualification Case) काहीच हालचाल होत नसल्याने आम्हाला कोर्टात जावं लागलं. त्यामुळे कोर्टाकडून 31 डिसेंबरपर्यंत निर्णय देण्याच्या सूचना देण्यात आली. यानंतर विधिमंडळाच्या अध्यक्षांनी 10 जानेवारी पर्यंतची मुदत वाढवून मागितल्याने उद्या याबाबत निर्णय येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी दिली. ते आज कोल्हापूरमध्ये बोलत होते.
शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील
अनिल देसाई म्हणाले की, या सगळ्यात उद्या शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील यात शंका नाही. कशा रीतीने पक्षाच्या विरोधी वागला? पक्षाने अधिकृतपणे बोलवलेल्या बैठकीला आले नाहीत. व्हीप लागू करण्यात आला होता, त्यावेळी देखील पक्षाच्या विरोधी मतं केली, या सगळ्या कारणांनी हे अपात्र होतील. लोकशाहीला साजेसा निकाल येईल अशी आशा आहे.
लोक आता निवडणुकीची वाट पाहत आहेत
जगात आपली लोकशाही सगळ्यात मोठी आहे, दबाव तंत्र, धाडी तंत्र हे आपण पाहत आलो आहे, तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, निवडणुकीचे घोडे मैदान लांब नाही. महाराष्ट्रात जी चुकीची संस्कृती आणली आहे ती लोकांना माहिती आहे. लोक आता निवडणुकीची वाट पाहत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
बाबरी पडणारे शिवसैनिक आहेत
अनिल देसाई म्हणाले की, बाबरी पडणारे शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी बोलण्याचे धाडस दाखवले. राम मंदिर झालं पाहिजे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ज्यावेळी तारीख पे तारीख सुरू होती त्यावेळी उध्दव ठाकरे अयोध्येला जाऊन आले.
जागावाटपावर अनिल देसाई काय म्हणाले?
आगामी लोकसभेसाठी जागावाटप कसे व्हावे यासाठी सगळ्यांना विचारत घेऊन जागावाटप होईल. घटक पक्षांचे मुंबईत दावे होत आहेत त्याचाही विचार होईल. सर्वस्वी अधिकार उध्दव ठाकरे यांना आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
आदित्य ठाकरे दोनदिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर
दुसरीकडे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज (9 जानेवारी) आणि उद्या दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभा तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सुरु असलेली सुंदोपसुंदी आणि कोल्हापूर जागेसाठी उमेदवार या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा दौरा महत्त्वपूर्ण असेल. आज हुतात्मा क्रांती चौक गारगोटीत जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता मिरजकर तिकीट कोल्हापुरात जाहीर सभा होईल. त्यानंतर कोल्हापुरात मुक्काम असेल. दुसऱ्या दिवशी बुधवारी यशवंत मंगल कार्यालय, हुपरी येथे मेळावा होईल.
इतर महत्वाच्या बातम्या