Kolhapur News: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शाहू महाराजांचा जीवनपट उलगडणाऱ्या ऐतिहासिक दुर्मिळ कागदपत्रे आणि छायाचित्रांचे एकदिवसीय प्रदर्शन केशवराव भोसले नाट्यगृहातील भालजी पेंढारकर कलादालनात भरवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन कोल्हापूर महानगरपालिका आणि पुरातत्व विभागाकडून भरविले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. 


प्रदर्शनामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक विधान, राज्यारोहण, शाहूकालीन पत्रव्यवहार, शाहू महाराजांनी दीन-दुबळ्यांसाठी, समाजाच्या उद्धारासाठी केलेले कार्य, शाहू महाराजांचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, कला, क्रीडा तसेच अन्य विविध क्षेत्रातील कार्य, प्रशासकीय आदेश तसेच महाराजांनी राज्यकारभार करताना वेळोवेळी घेतलेले निर्णय यांची महत्त्वाची निवडक कागदपत्रे प्रदर्शनात ठेवली आहेत. त्याचबरोबर शाहूकालीन दुर्मिळ छायाचित्रेही लावण्यात आली आहेत.


समता दिंडीला भरघोस प्रतिसाद


दरम्य्यान, महाराजांचे स्मरण करुन देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्हा प्रशासन आणि सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या वतीने दसरा चौकात समता दिंडीसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. समता दिंडीचे उद्घाटन शाहू महाराज छत्रपती आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते समता दिंडीला हिरवा झेंडा दाखवून करून करण्यात आले. दसरा चौकात सुरुवात झालेली समता दिंडी पुढे व्हिनस कॉर्नर- आईसाहेबांचा पुतळा- बिंदू चौकात येऊन या दिंडीचा समारोप झाला. 


राजर्षी शाहू महाराज पुरस्कार आणि अन्य पुरस्कारांचे वितरण


दरम्यान, छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतींचे जतन होण्यासाठी आवश्यक ते प्रकल्प पुन्हा सुरु करण्यात येतील. छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रयत्नातून लवकरच सुरु करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. राजर्षी शाहू महाराज पुरस्कार, आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार व विशेष उल्लेखनीय शिक्षक गौरव पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री केसरकर म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उत्कृष्ट शासन व्यवस्था कशी असावी या संदर्भात काढलेले शासननिर्णय आजही समाजाला दिशादर्शक आहेत. जीवनात प्रगती हवी असेल, तर शिक्षण आवश्यक आहे, हा विचार शाहू महाराजांनी रुजवला. शिक्षण केवळ एका समाजापूरते मर्यादीत न राहता समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी त्यांनी विविध हॉस्टेल्स काढले, स्त्री शिक्षणाचे महत्व त्यांनी आपल्या संस्थानामध्ये दिले. 


इतर महत्वाच्या बातम्या