Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची सासूरवाडी कोल्हापूर (Kolhapur News) आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. अमित शाह यांचे कोल्हापूर कनेक्शन म्हणजे त्यांच्या पत्नी सोनल शाह या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. म्हणजेच अमित शाह कोल्हापूरचे जावईबापू आहेत. त्यामुळे होम मिनिस्टरांच्या आग्रहामुळे अमित शाह रविवारी (19 फेब्रुवारी) कोल्हापूरमध्ये येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या एस. एम. लोहिया शाळेमध्ये शिकल्या आहेत. सोनल शाह यांचे पाहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण याच शाळेत घेतले आहे. त्यामुळे आजही सोनल शाह आपल्या मित्र मैत्रिणींच्या संपर्कात आहेत. त्यांना आजही शाळेबद्दल आपुलकी आहे. त्यामुळे सोनल भाभी ज्या शाळेत शिकल्या त्या शाळेच्या संस्थेचं यंदा शताब्दी वर्ष साजरे होत आहे.   


त्यामुळे दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवाच्या आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सोनल भाभी यांनी अमित शाह यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यामुळे अमित शाह केंद्रीय होम मिनिस्टर असले, तरी घरच्या होम मिनिस्टरांचा आग्रह त्यांना मोडता आला नाही. त्यामुळे अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्याला कौटुंबिक आणि भावनिक किनार आहे. या शाळेसाठी अमित शाह आणि सोनल शाह यांनी वेळोवेळी सहकार्य केलं आहे. म्हणूनच शताब्दी वर्षाच्या सांगता समारंभाला अमित शाह यांच्यासारखा दुसरा पाहुणा नाही असे देखील मत शाळेने व्यक्त केलं आहे. 


कोल्हापुरात भाजपला हुलकावणी 


दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराचा बालेकिल्ला समजला जातो. याच भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्वाधिक प्राबल्य आहे. त्यामुळे सहकारात बस्तान बसवण्यासाठी भाजपकडून शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापूर जिल्हाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे एका महिन्यात तीन केंद्रीय मंत्र्यांचा कोल्हापूर दौरा झाला आहे. यापूर्वी ज्योतिरादित्य शिंदे आणि नितीन गडकरी (nitin gadkari) यांचा दौरा झाला. ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya Shinde) तीन महिन्यात दोनदा कोल्हापूरला आले. या दौऱ्यात त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला होता. दुसरीकडे, नितीन गडकरी यांनी बास्केट ब्रिजची पायाभरणी करत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. या दोन्ही  दौऱ्यानंतर आता अमित शाह यांचा दौरा होत असून ते सुद्धा कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. तसेच दोन्ही लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. 


कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला असला, तरी आगामी निवडणूक ते भाजपच्याच चिन्हावर निवडणूक लढवतील हे जवळपास अंतिम आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे असले, तरी ते पुण्यातून आमदार आहेत. त्यामुळे कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नसल्याने ती पोकळी भरून काढण्यासाठी सुद्धा पक्षाकडून प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपने मारलेली मुसंडी राजकीय भूवया उंचावणारी होती. या मतदारसंघातून भाजपकडून सत्यजित कदम यांनी निवडणूक लढवली होती.  


इतर महत्वाच्या बातम्या