Raju Shetti on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी (19 फेब्रुवारी) रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. अवघ्या एक महिन्याच्या आत मोदी सरकारमधील तीन बड्या नेत्यांकडून कोल्हापूर दौरा होत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जय्यत तयारी सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विकासकामांचा आढावा घेतला. यानंतर 28 जानेवारी रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर आले. त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावाही पार पडला. यानंतर आता भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह (Amit Shah) 19 फेब्रुवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यातही कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.  


दरम्यान, भाजपकडून सुरु करण्यात आलेल्या जोरदार तयारीनंतर दोन्ही मतदारसंघातील इच्छुक तसेच शिंदे गटाची सुद्दा धाकधूक वाढत चालली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी (Raju Shetti on Amit Shah) मात्र भाजपच्या तयारीकडे आव्हान म्हणून न पाहता खोचक शब्दात टोला लगावला आहे.  


आमच्याकडे तणनाशक, त्यामध्ये कमळ फुलणार नाही 


अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी विचारण्यात आले. यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, "आमच्याकडेही फवारणी असून त्यामध्ये कमळ फुलणार नाही." राजू शेट्टी बुधवारी पत्रकार परिषदेत कोल्हापुरात बोलत होते. यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येणाऱ्या चक्काजाम आंदोलनाची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 22 फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग वगळून अन्य मार्गांवर हे आंदोलन होईल. 


अमित शाह 19 फेब्रुवारीला कोल्हापूर दौऱ्यावर 


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 फेब्रुवारीला कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यावर येत आहेत. शाह दोनदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून 18 फेब्रुवारीला ते नागपूर आणि पुण्यामध्ये असतील. कोल्हापुरात न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. न्यू एज्युकेशन सोसायटी प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलसह अनेक शाळा आणि महाविद्यालये चालवते. शाह यांच्या पत्नी सोनल शाह सुमारे 40 वर्षांपूर्वी याच शाळेच्या विद्यार्थिनी होत्या. शाह 19 फेब्रुवारीला कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. तसेच नागाळा पार्कमधील पक्ष कार्यालयाच्या परिसरात मंदिराची पायाभरणी करतील. भाजपचे स्थानिक नेते शाह यांच्या भव्य स्वागताच्या तयारीत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या