Kolhapur News : कोल्हापुरात (Kolhapur News) आज मंत्र्यांची मादियाळी येणार असल्यानं कोल्हापूरला अक्षरश: पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यासाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ), उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आज कोल्हापुरात (Kolhapur) असणार आहेत. त्यामुळे शहरात मंत्र्यांची मांदियाळी असणार आहे. विविध कार्यक्रमांत त्यांची उपस्थिती असणार आहे. 


सिद्धगिरी मठावर होणाऱ्या सुमंगल महोत्सवाच्या शोभायात्रेला दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामील होतील. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शोभायात्रा निघणार आहे. त्या अंतर्गत पंचगंगा नदीची आरती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर असणार आहेत. त्यांच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी उद्योगमंत्री सामंत दुपारी 12 वाजता महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागांतील बेरोजगार मराठी युवक-युवतींसाठी आयोजित रोजगार मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. कागलच्या अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालयात हा मेळावा होईल.


अमित शाह यांचा दौरा कार्यक्रम 


दुपारी दीड वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर ते अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जातील. दुपारी अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण आणि नंतर दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण कार्यक्रमास उपस्थिती असेल. त्यानंतर ते हॉटेल पंचशीलकडे रवाना होतील. दुपारी सव्वा तीन वाजता दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवाला हजेरी लावतील. सायंकाळी 5 वाजता भाजप कार्यालय, नागाळा पार्ककडे प्रयाण करतील. सायंकाळी 5 ते 6.30 या कालावधीत भाजपच्या विजय संकल्प रॅली होणार आहे. त्यानंतर त्यांचे हॉटेल पॅव्हेलियन येथे आगमन होईल. या ठिकाणी बैठक होईल. त्यानंतर कोल्हापूर विमानतळावरून रात्री 9.30 वाजता विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील. 


मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला उद्या कोल्हापुरात ठरणार?


एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah in Kolhapur) आज कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कोल्हापुरात आहेत.


शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं आहे. या दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा निर्णय झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सरकारकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.  


महत्वाच्या इतर बातम्या :