Ajit Pawar on Devendra Fadnavis: विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्रात जातीय सलोखा बिघडवण्यासाठी सुरु असलेल्या अप्रत्यक्ष प्रयत्नांवरुन शिंदे-फडणवीस सरकारला खडे बोल सुनावले आहेत. अजित पवारांनी नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांचाही कोल्हापुरात (Kolhapur News) बोलताना समाचार घेतला.  


गृहखात्यावर वचक ठेवला पाहिजे


अजित पवारांनी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले. ते म्हणाले की, "गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आदरयुक्त भीती राहिल असा गृहखात्यावर वचक ठेवला पाहिजे. दंगली वाढतील असं दबक्या आवाजात बोललं जात आहे. कोणत्याही जाती, धर्म आणि पंथामध्ये दुसऱ्याचा द्वेष आणि अनादर करावा असं कृत्य करु नये."


महाराष्ट्रामध्ये आज का दंगली होत आहेत? 


अजित पवार म्हणाले की, "आज काल काय वक्तव्ये केली जात आहेत हे आपण पाहतो. महाराष्ट्रामध्ये आज का दंगली होत आहेत? सत्ताधारी राज्यकर्ते जाणीवपूर्वक महागाई, बेरोजगारीवरुन लक्ष विचलित करत आहे. त्यांनी मंदिरामध्ये जाताना पोशाखावरुन सुरु असलेल्या वादावरुनही टीका केली. ते म्हणाले तो पोशाख आहे, हाप पॅन्टमध्ये दर्शन घेतले तर कुठे बिघडले? कोणत्या रस्त्याने महाराष्ट्र घेऊन चालला आहात?"


नोटबंदीचा फतवा काढला


मोदी सरकारकडून 2 हजार रुपयांच्या नोटेवर संक्रांत आणल्यानंतर पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे. अजित पवार म्हणाले की, "अचानक 2 हजारची नोट बंद करण्याचा फतवा काढला. श्रीमंत लोकांकडे असेल, पण गरिबांकडे पण 2 हजारांची नोट जपून ठेवली असेल ना? अनेक पंतप्रधानांचे आपण काम पाहिले, पण आता सारखे सारखे का निर्णय बदलले जात आहेत? असं का घडतं आहे, पण हे निर्णय देशहिताच्या दृष्टीने असेल तर ठीक आहे. पूर्वी नोटा बंद झाल्या त्यावेळी लोकांनी खूप काही सहन केलं. या नोटबंदीमधून काळा पैसा बाहेर येईल आणि डुप्लिकेट नोटांना आळा बसेल असे सर्वसामान्यांना वाटलं होतं. त्यामुळे त्यांनी ते सहन केलं. आता दोन हजार रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय घेतला. तीन महिन्यात या नोटा बंद होणार असल्याने लोकांना फार त्रास होईल असं वाटत नाही. अनेक महिने दोन हजार रुपयांच्या नोटा छपाई बंद झाली होती याबद्दल अधिक अधिकार वाणीने आरबीआय सांगू शकेल."


भाजपत अनेक नेते जाणार असल्याचे दावे करण्यात येत आहेत. मात्र, असे दावे अनेक वर्ष करण्यात येत आहेत ज्या वेळेस हे दावे खरे ठरतील त्यावेळेस या दाव्यांना महत्त्व ठरेल. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यावर दुर्लक्ष करण्यासाठी असे दावे केले जात आहेत. अशा पद्धतीने बातम्या देऊन ते नेमकं काय साध्य करतात हे अजून पर्यंत कळलेलं नाही. अशा बातम्यांमुळे पेट्रोल दरवाढ कमी होणार आहे का? सिलेंडरच्या किमती कमी होणार आहेत का? तरुणांना रोजगार मिळणार आहेत का? अशी विचारणा त्यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या