कोल्हापूर : अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून या आधीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बिद्री साखर कारखान्यामध्ये (Bidri Sakhar Karkhana) हसन मुश्रीफांविरोधात ए वाय पाटलांनी भूमिका घेतली होती. बिद्रीच्या निकालानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुद्धा रंगली होती. 

Continues below advertisement

ए. वाय. पाटील, अर्जुन आबिटकर यांना पराभवाचा धक्का

नुकत्याच झालेल्या बिद्री साखर कारखाना निवडणुकीत दोन खासदार, दोन कॅबिनेट मंत्री, दोन आमदार, पाच माजी आमदार आणि गोकुळ अध्यक्ष अशी तगडी फौज उतरल्यामुळे प्रचंड ईर्षा निर्माण झाली होती. तथापि, बिद्रीच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने पुन्हा बाजी मारली होती.. श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने 25 पैकी 25 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा सुमारे साडे पाच हजारांहून अधिक मताधिक्क्यांनी पराभव केला. विरोधी गटाकडून कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, संचालक बाबासाहेब हिंदुराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांना पराभव पत्करावा लागला.  

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी व विरोधी आघाडीने कारखाना कार्यक्षेत्र असलेल्या राधानगरी, भुदरगड, कागल आणि करवीर तालुक्यात जोरदार प्रचार केला होता. मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री चंद्रकांत पाटील हे दोघे या निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने उभे ठाकले होते. मुश्रीफांनी सत्ताधारी पॅनेलचे नेतृत्व केले. तर मंत्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी आघाडीने ही निवडणूक लढविली. बिद्रीसाठी एकूण 56 हजार 91 सभासदांपैकी 49 हजार 940 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ए. वाय.पाटील अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असतानाही त्यांनी विरोधी आघाडीला साथ दिली होती. दारुण पराभवानंतर ए. वाय. पाटील भाजप वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती.

Continues below advertisement

आता जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झाल्याने ए. वाय. पाटील काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.   

इतर महत्वाच्या बातम्या