Ajit Pawar In Kolhapur : विरोधी पक्षनेते अजित पवार आज कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यावर आहेत. त्यांचे आज कागलमध्ये भरगच्च कार्यक्रम आहे. अजित पवारांच्या एका कार्यक्रमात एक वेगळी गोष्ट पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील ( A Y Patil) आणि त्यांचे राजकीय विरोधक असलेले आणि नात्याने मेहुणे पाहुणे असलेले के. पी. पाटील (K. P. Patil) एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे राजकीय भुवया उंचावल्या. 


गेल्या काही दिवसांमध्ये या मेव्हणे पाव्हण्यांमध्ये राजकीय वाद टोकाला गेला आहे. ए. वाय. पाटील यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. मात्र, त्यांचं बंड शमविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं होतं. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड अंतर्गत वाद सुरू असल्याने त्याचा परिणाम पक्षावरही झाला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेल्या ए. वाय. पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत निर्णय घेण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ते शिंदे गटाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिसून आल्यानंतर ते शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा रंगली. मात्र हसन मुश्रीफ यांनी दोन्ही नेत्यांना शांत केले होते. त्यामुळे पक्षांतर्गत वाद मिटलाचे दिसून आले होते. आता हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसल्याने वाद मिटला की, दाखवण्यासाठी एकत्र आले, याची चर्चा सुरु झाली आहे. 


तत्पूर्वी, डिसेंबर महिन्यात आर. के. पोवार आणि अनिल साळोखे यांच्यातही वादाची ठिणगी पडली होती. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांच एकेरी उल्लेख करण्यापर्यंत वाद जाऊन पोहोचला. त्यामुळे आदिल फरास यांनी मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांना बाजूला करून वादावर पडदा टाकला होता.  


अजित पवारांच्या हस्ते विकामकामांचे लोकार्पण 


दरम्यान, अजित पवार यांच्या आज कागल दौऱ्यामध्ये कागल शहरातील श्रमिक वसाहतीमधील राजमाता जिजाऊ माँसाहेब या बगीचाचे लोकार्पण, बस स्टॅन्ड परिसरात कागलचे अधिपती श्रीमंत जयसिंगराव महाराज (बाळ महाराज) पुतळा सुशोभीकरण, निपाणी वेस येथील राधाकृष्ण मंदिराचा विस्तारित सभामंडप या विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. आज (17 फेब्रुवारी) सहा वाजता गैबी चौकामध्ये शेतकरी, युवक व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 


हसन मुश्रीफ अडचणीत असताना राजकीय बळ 


गेल्या काही महिन्यांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. आतापर्यंत दोनवेळा छापेमारी आणि तिन्ही मुलांनाही अटकपूर्व जामीन नाकारण्यात आल्याने अडचणी वाढत चालल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या दौऱ्यातून ते आपली ताकद दाखवतील, अशी चर्चा आहे. अजित पवार यांनीही कागल दौरा करत मुश्रीफांच्या पाठिशी पक्ष ठामपणे असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या