Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अशी दिग्गज मंडळी कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यावर असणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांची टीम कोल्हापूर पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाली आहे. दौऱ्याच्या नियोजनासाठी रंगीत तालीमही होणार आहे. मंत्री शाह यांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही दौरे आहेत. मुख्यमंत्री आजऱ्यात असणार आहेत. आज (17 फेब्रुवारी) विरोधी पक्षनेते अजित पवार कागल दौऱ्यावर आहेत. त्यामुळे व्हीव्हीआयपी जिल्हा दौऱ्यावर असल्याने त्यांच्या ‘प्रोटोकॉल’प्रमाणे बंदोबस्ताच्या नियोजनासाठी दिल्लीतील अधिकारी कोल्हापुरात पोहोचले. दशहतवादविरोधी पथक (एटीएस) यांच्यासह अन्य पथकांकडून तसेच दिल्ली, मुंबईतून पोलिस अधीक्षकांशी समन्वय ठेवून आहेत.
मनपा प्रशासनाकडून पाहणी
दरम्यान, अमित शाह यांच्या रविवारच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने केलेल्या विविध कामांची प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. प्रशासकांनी रस्त्यांची डागडुजी, फांद्यांचे कटिंग, चॅनेल स्वच्छता, रंगरंगोटी, स्टेज व्यवस्थेचीही पाहणी केली. पंचगंगा घाटावर सुमंगलम लोकोत्सवानिमित्त महाआरती होत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकजण उपस्थित राहणार आहेत. महापालिकेने उभारलेल्या व्यासपीठाची पाहणी केली.
अमित शाह यांच्या भेटीच्या परवानगीसाठी गर्दी
दुसरीकडे, अमित शाह यांना भेटण्यासाठी माहिती पोलिसांना द्यावी लागत असल्याने शाह यांचे नातेवाईक तसेच मित्रमंडळींकडून त्यांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे परवानगी घेण्यासाठी धांदल उडाली आहे. दरम्यान, दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सवी वर्षाचा सांगता कार्यक्रम रविवारी दुपारी होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पेटाळामध्ये कार्यक्रम होईल. सोसायटीची वाटचाल मांडणाऱ्या ‘शतसंवत्सरी’ या स्मरणिकेचे प्रकाशन होईल, अशी माहिती या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांनी दिली.
या कार्यक्रमास अमित शाह यांच्यासह त्यांच्या पत्नी सोनल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर प्रमुख उपस्थित असणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी असतील. स्मरणिका प्रकाशन तसेच व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे, आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटील, गिर्यारोहक कस्तुरी सावेकर, गुणवंत विद्यार्थिनी सिद्धी आवटे (इयत्ता दहावी), काजल कोथळकर (इयत्ता बारावी) यांचा सत्कार अमित शाह यांच्या हस्ते होईल.
इतर महत्वाच्या बातम्या