कोल्हापूर : राज्यात सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वातावरण आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात जोमाने प्रचार करतोय. काहीही झालं तरी मीच विजयी होणार, असा दावा प्रत्येक उमेदवाराकडून केला जातोय. मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्या पाठिंब्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न केला जातोय. या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर (Kolhapur) मतदारसंघाची विशेष चर्चा होत आहे. कारण या जागेवर राजघराण्यातील छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या जागेवर नेमका कोणाचा विजय होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान, या निवडणुकीत शाहू महाराजांची ताकद चांगलीच वाढली आहे. कारण या जागेसाठी त्यांना एमआयएमने पाठिंबा दिला आहे. 


एमएयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा


एमआयएमचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी आज (21 एप्रिल) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एमआयएम पक्षाची कोल्हापूर मतदारसंघासाठीची भूमिका स्पष्ट केली. आम्ही कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा देत आहोत, असे यावेळी जलील यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुस्लीम समाज एमआयएमचा मतदार आहे. कोल्हापुरातही मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. असे असताना एमआयएमने पाठिंबा दिल्याने एका प्रकारे शाहू महाराजांची ताकद वाढणार आहे. 


वंचितचाही शाहू महाराजांना बिनशर्त पाठिंबा


वंचित बहुजन आघाडीनेदेखील या जागेवर आपला उमेदवार उभा केलेला नाही. वंचितने या जागेवर छत्रपती शाहू महाराजंना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश व्हावा यासाठी मविआच्या नेत्यांनी बरेच प्रयत्न केले. गेल्या काही महिन्यांत त्यासाठी वंचितचे आणि मविआच्या नेत्यांत अनेक बैठका झाल्या. मात्र शेवटपर्यंत या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी आता वंचित बहुजन आघाडीने वेगवेगळ्या मतदारसंघावर आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मात्र कोल्हापूरच्या जागेवर कोणताही उमेदवार दिलेला नाही. त्यांनी येथे छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दलित तसेच बहुजनांचाही पाठिंबा शाहू महाराजांना मिळण्याची शक्यता आहे. शाहू महाराज निवडून यावेत यासाठी महाविकास आघाडी या जागेवर एकदिलाने प्रचार करत आहे.  


शाहू महाराजांविरोधात विरुद्ध संजय मंडलिक


दरम्यान, लोल्हापूरच्या जागेवर महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय मंडलिक यांना तिकीट दिले आहे. ही जागा जिंकण्यासाठी ते पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. त्यामुळे येथे छत्रपती शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यात थेट लढत होणार आहे. मंडलिक विजयी व्हावेत यासाठी महायुतीने या जागेवर संपूर्ण यंत्रणा लावली आहे. त्यामुळे आता येथून कोण विजयी होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा :


इम्तियाज जलील यांनी दंड थोपटले, 24 तारखेला भरणार उमेदवारी अर्ज, संभाजीनगरात तिहेरी लढत पक्की!


60 सेकंदाच्या प्रचारगीतामधील 1 सेकंद हेरलं; निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना घेरलं!


'मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही'; जळगावातून शरद पवारांनी डागली तोफ