कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) ची वार्षिक सर्वसाधारण सभा आज (15 सप्टेंबर) होत आहे. गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे दुपारी एक वाजता होणार आहे. सभेसाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून या ठिकाणी पाच हजार खूर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेसाठी तपासणी करूनच आत सोडले जाणार आहे. सभेच्या ठिकाणी जमण्यास सुरुवात झाली आहे. या सभेसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील उपस्थित राहणार आहेत. सभेच्या पार्श्‍वभूमीवर महिन्याभरापासून संचालकांच्या वतीने तालुकानिहाय दूध संस्थांच्या बैठका घेऊन संघाच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला जात आहे. 


गोकुळच्या आजवरच्या सभेचा इतिहास पाहता ही सुध्दा सभा अत्यंत वादळी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी महाडिक गटांमध्ये गोकुळच्या कारभारावरून सातत्याने आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. त्यामुळे त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, सभेपूर्वी महाडिक गटाकडून सत्ताधाऱ्यांना पोस्टरच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आले आहेत, उत्तर द्या म्हणत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. 20 ते 25 ठिकाणी पोस्टरच्या माध्यमातून महाडिक गटाकडून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आल्याने तेच प्रश्न पुन्हा एकदा सभेमध्ये उपस्थित केले जातील याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. 


सभेपूर्वी मार्गावर पोस्टरबाजी 


दरम्यान, सभेच्या मार्गावर विरोधी महाडिक गटाकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. दोन वर्षात किती लिटर वासाचे दुध परत केले? कर्मचाऱ्यांना काम करू द्या, सततच्या बदल्या आणि म्हशी घेण्यासाठी दबाव कधीपर्यंत? कर्मचाऱ्यांची पिळवणूक कधी थांबणार? आमचं दुध नाकारलं, राजकारण केलं आणि बाहेरच्या राज्यातून 5.5 कोटी लिटर दूध खरेदी केले कशासाठी? उत्तर द्या. बाराशे संस्था नक्की काय साधलं?  रणजित धुमाळांकडे कोणत्या विभागाचा दूध विक्रीचा ठेका? 


आजवरचा इतिहास पाहता गोकुळच्या सभा या एक मिनिटांमध्ये गुंडाळण्यापासून ते खुर्च्या बांधून घालण्यापर्यंत पराक्रम घडले आहेत. त्यामुळे आजच्या सभेत पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 75 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सभेवर देखरेख असणार आहे. 


तत्पूर्वी, गुरुवारी सत्ताधारी तसेच विरोधी आघाडीकडून पत्रकार परिषद घेत सभेच्या पार्श्वभूमीवर माहिती देण्यात आली होती. यावेळी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला होता. संघाबाबत प्रश्न विचारल्यावर सतेज पाटील काही बोलत नाहीत. कारण संघ म्हणजे महाडिकांचे ठेके आणि टॅंकर एवढ्यापुरतेच त्यांचे ज्ञान मर्यादित आहे, असेही शौमिका महाडिक म्हणाल्या. दुसरीकडे, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील, सभा शांततेत पार पाडावी असे आवाहन यावेळी केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या