कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'ची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (15 सप्टेंबर) होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या असल्याने उद्याची सभा वादळी होण्याची शक्यता आहे. मात्र, आजच सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष समोर आला. या सभेच्या माध्यमातून महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील यांचे कार्यकर्ते पुन्हा भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे दुपारी एक वाजता होणार आहे.
तर गोकुळची अवस्था शेतकरी संघासारखी होईल
सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, सतेज पाटील यांना 'गोकुळ'मधील केवळ महाडिकांचे टँकर आणि वासाचे दूध इतकंच ज्ञान आहे. याव्यतिरिक्त त्यांची बौद्धिक क्षमता तेवढीच आहे. गोकुळच्या सत्ताधाऱ्यांनी लवकर कारभार सुधारला नाही, तर गोकुळची अवस्था मयूर दूध संघ नव्हे तर शेतकरी संघासारखी होईल असंही शौमिका महाडिक म्हणाल्या. सत्ताधाऱ्यांकडे काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याची समाधानकारक उत्तर मिळावीत. गोकुळ दूध संघामध्ये सध्या जे काही सुरू आहे ते शेतकऱ्यांच्या हिताचे नाही असा आरोप शौमिका महाडिक यांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यात अमूलने आपले संकलन वाढवले असून गोकुळसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे शौमिका महाडिक म्हणाल्या.
'गोकुळ'चे हित डोळ्यासमोर ठेवून सर्वसाधारण सभा पार पाडावी
विरोधी गटाकडून टीकास्त्र सोडण्यात आल्यानंतर सत्ताधारी गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी गोकुळ दूध संघाचे हित डोळ्यासमोर ठेवून सर्वसाधारण सभा पार पाडावी, असं आवाहन केले. सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं सभेमधून दिली जाणार आहेत असेही डोंगळे म्हणाले. सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. त्यामुळे सभासदांनी आणि विरोधकांनी ही सभा शांततेत पार पडावी असे आवाहन डोंगळे यांनी केले. गोकुळचे 20 लाखांपर्यंतचे दूध संकलन वाढविण्याचे आव्हान आहे. यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेबद्दलची माहिती वार्षिक सभेत दिली जाणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या