कोल्हापूर : कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात 2 जून रोजी मुंबई बॉम्बस्फोटातील कैदी मुन्ना खान याचा पाच कैद्यांनी खून केला. कळंबा कारागृहात गांजा विक्री करणाऱ्या मुन्ना खानसोबत आर्थिक कारणावरून झालेल्या वादातून पाच कैद्यांनी त्याचा खून केल्याचे जुना राजवाडा पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कळंबा कारागृहात सुरू असलेले गैरप्रकार पुन्हा समोर आले आहेत.


मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान हा कळंबा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. 2013 पासून कळंबा कारागृहात राहणाऱ्या मुन्नाने पैशाच्या जोरावर दहशत निर्माण केली होती. अधिकारी, कर्मचारी आणि काही तस्करांना हाताशी धरून तो कारागृहात गांजा विक्री करीत होता. मोक्काच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणारा बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण हा मुन्नाकडून नियमित गांजाची खरेदी करत होता. तसेच बबलू हा कॅन्टीनमधून छुप्या मार्गाने मिळणाऱ्या काही वस्तू मुन्नाला देत होता. यातून झालेल्या आर्थिक व्यवहारातून दोघांमध्ये वाद झाला. त्याच वादातून बबलू चव्हाण आणि प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील या दोघांनी अन्य तीन कैद्यांच्या मदतीने मुन्ना खान याला संपवण्याचा कट रचून आंघोळीच्या हौदावर त्याचा खून केला अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 


कुख्यात आरोपींकडून कारागृहात स्वतंत्र यंत्रणा


कळंबा कारागृहात गांजा आणि मोबाइल सापडण्याचे प्रकार सातत्याने घडतात. यातून 9 कर्मचाऱ्यांसह दोन अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई झाली. मात्र, त्यानंतरही कारागृह प्रशासनाच्या कारभारात सुधारणा झालेली दिसत नाही. कुख्यात आरोपींकडून कारागृहात स्वतंत्र यंत्रणा चालवली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. कोल्हापूरच्या कळंबा कारागरात चालणारे अवैध प्रकार येथे मिळणाऱ्या सुविधा यांच्यामुळे अनेक कैदी कळंबा कारागृहासाठी फिल्डिंग लावतात. यामध्ये आरोपींच्या वकिलांची देखील मदत होत असते. मात्र, या सगळ्यामुळे कळंबा कारागृह पूर्णपणे बदनाम झालं आहे. 


कळंबा कारागृहामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. हे जरी खरं असलं तरी गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये अवैध प्रकार प्रचंड झाले आहेत. शिक्षा भोगत असलेले कैदी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच सर्व काही सुरू असल्याचे आरोप अनेक वेळा करण्यात आले. मात्र, त्यानंतर देखील कोणतीच सुधारणा जेल प्रशासनाने केली नाही.


इतर महत्वाच्या बातम्या