Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता 474 पैकी 429 ग्रामपंचायतींसाठी (Kolhapur District Gram Panchayat Election) अत्यंत चुरशीने 84.08 टक्के मतदान झाले. संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राधानागरी तालुक्यात सर्वाधिक 8904. टक्के तर गडहिंग्लज तालुक्यात 77.01 टक्के सर्वात कमी मतदान झाले. उद्या मंगळवारी सकाळी आठपासून मतमोजणी ज्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी होईल. जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी 4 लाख 12 हजार 182 महिलांनी, 44 लाख 87 हजार 63 पुरुषांनी इतर असे एकूण 8 लाख 60 हजार 955 मतदारांनी मतदान केले. 


मतदारांना आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी ताकद लावली होती. कामासाठी बाहेर असणाऱ्यांना मतदानासाठी आणण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सकाळपासून दुपारपर्यंत आणि दुपारनंतर सायंकाळपर्यंत चुरशीने मतदान झाले. सर्वाधिक चुरस असलेल्या करवीर तालुक्यात उचगाव, पाचगाव, कळंबा, उजळाईवाडी, वडणगे, सांगरूळसह संवेदनशील गावात ईर्ष्येने मतदान पार पडले. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ, रांगोळी, अब्दुललाट, कोरोची, घुणकी, तळसंदे, पारगावमध्ये मतदान सुरू झाल्यापासून ते दुपारपर्यंत आणि दुपारी तीन ते मतदान संपेपर्यंत लोकांना रस्त्यावर पाय ठेवायला जागा नव्हती, असे चित्र होते.


चंदगड, गडहिंग्लज, आजरा व भुदरगड तालुक्यातील गावांतून कामानिमित्त पुणे-मुंबईला गेलेल्या मतदारांना आणण्यासाठी ट्रॅव्हल्सची व्यवस्था होती. त्यामुळे मतदारांना एकत्रित येणे सोपे झाले. गगनबावडा व पन्हाळा तालुक्यात मतदान यंत्रे बंद पडल्याने काही ठिकाणी अर्धा ते एक तासापर्यंत मतदारांना ताटकळत थांबावे लागले. मतदानासाठी दुचाकी, रिक्षा, चारचाकीसह मिळेल त्या पर्यायाने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत सुरक्षित आणण्यात  आले. ज्येष्ठ मतदारांसोबत विरोधी गटातील एकही व्यक्ती जाऊ नये, याची काळजी घेतली जात होती. (Kolhapur District Gram Panchayat Election)


चार तालुक्यातील विविध गावांमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड 


दरम्यान, चार तालुक्यातील विविध गावांमध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे प्रकार घडले. धुंदवडे, मणदूर, गारीवडे, बोरबेट, खोकुर्ले, शेळाशी (ता. गगनबावडा), राशिवडे (ता. करवीर) येथील एकाच केंद्रावरील दोन तसेच कंदलगाव व पासार्डे (ता. करवीर). भादवण, मोहाळे, होन्याळी दाभिल (ता. आजरा). पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे यंत्रांमध्ये बिघाड झाला.


इतर महत्वाच्या बातम्या