Kolhapur Rain Update : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या संततधार पावसाने सकाळपासून उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पंचगंगा नदी गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार मोसमात प्रथमच पात्राबाहेर पडली आहे. दुसरीकडे आज सकाळपासून राधानगरी धरणातून 1200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


दरम्यान, जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरु असल्याने 27 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे व राशिवडे बंधारा पाण्याखाली गेला आहे. 


कासारी नदीवरील वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, पेंडाखळे व बाजारभोगाव पाण्याखाली आहे. कुंभी नदीवरील मांडूकली, शेणवडे, कळे व वेतवडे बंधारे पाण्याखाली आहेत. धामणी नदीवरील सुळे व अंबार्डे बंधारा पाण्यात आहे.  दुधगंगा नदीवरील दत्तवाड, तर तुळशी नदीवरील बीड व वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे व चिखली असे 27 बंधारे पाण्याखाली आहेत. 


जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. यामधील एक कोल्हापूरमध्ये, तर एक शिरोळ तालुक्यात तैनात असेल. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत  वेगाने वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावर सर्व यंत्रणांना सज्जतेचे आदेश दिले आहेत. पुरबाधित नागरिक व जनावरांचे वेळेत सुरक्षित स्थलांतर करण्यासही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.