Kolhapur News: कोल्हापूर शहरात आजपासून (2 जून) केंद्रीय प्रवेश परीक्षा सुरु झाली आहे. काॅमर्स इंग्रजी माध्यम आणि सायन्स शाखेतील प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या (www.dydekop.org) या वेबसाईटवर ऑनलाईन अर्जामधील पहिला भाग (नोंदणी) भरायचा आहे. सुरुवातीच्या टप्प्यात भाग एकमध्ये विद्यार्थी नोंदणी करण्याची आहे. प्रवेश प्रक्रियेचे मुख्य केंद्र कमला कॉलेज राहणार आहे. दुसरीकडे, तंत्रशिक्षण संचालनालयाकडून पदविका अभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेलाही आजपासून सुरूवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 21 जूनपर्यंत आहे.
पहिल्या टप्प्यात कोणती माहिती भरता येणार?
विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात सर्वसाधारण माहिती देताना उत्तीर्ण वर्ष, बोर्ड, बैठक क्रमांक, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख, प्रवेश अर्ज शुल्कचा समावेश आहे. दहावीचे मूळ गुणपत्रक प्राप्त झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक वर नमूद केलेल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शिक्षण उपसंचालक वेबसाईटवर महाविद्यालयाची संयुक्त माहिती पुस्तिका, गतवर्षीचा कटऑफ, प्रवेश प्रक्रिया माहिती पुस्तिका, अर्ज भरण्याची प्रक्रियेची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने यंदा कोल्हापूर शहरातील 28 कनिष्ठ महाविद्यालयात काॅमर्स इंग्रजी माध्यम आणि सायन्स शाखेचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने भाग एक आणि भाग दोन भरून घेऊन साधारणतः चार ते पाच फेऱ्यांमध्ये प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. काॅमर्स मराठी माध्यम आणि कला शाखेची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांच्या पातळीवर होईल.
पहिल्या दिवशी माफक प्रतिसाद
आज प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी सायंकाळी पाचपर्यंत 35 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुपारी एकनंतर कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्जातील पहिला भाग (नोंदणी) भरण्याची प्रक्रिया सुरू झाली.
इतर महत्वाच्या बातम्या