पुणे : शेतकरीविरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी पुण्यात राज्यस्तरीय किसानपुत्र मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. पुण्याचे महापौर प्रशांत महापौर यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं.
जमीन अधिग्रहण कायदा आणि अत्यावश्यक वस्तू कायद्याने शेतकऱ्यांची वाताहत केली आहे. या कायद्यांमध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची अवस्था सुधारणार नाही, असं मत ज्येष्ठ समाजसेवक अमर हबीब यांनी मांडलं.
शेतकरीविरोधी कायद्यावर प्रहार करण्यासाठी किसानपुत्र आंदोलन सुरु केलं आहे. अनेक कायदे शेतकरी विरोधी आहेत. त्यातील सिलिंगच्या कायद्याने जशी शेतकऱ्यांची वाताहत केली तशीच जमीन अधिग्रहण आणि अत्यावश्यक वस्तू कायद्यानेही केली आहे, असं मत या मेळाव्यात मांडण्यात आलं.
या मेळाव्याला अनेक किसानपुत्र उपस्थित होते. यापूर्वी मुंबईत झालेल्या मेळाव्यातही किसानपुत्रांनी मोठ्या संख्येने हजरी लावली होती. किसानपुत्रांनी 'एक घाव माझा, एक घाव तुमचा' असं बोधवाक्य म्हणत शेतकरी विरोधी कायद्याच्या बेडीवर घाव घातला.