नवी दिल्ली: नोटाबंदीच्या तेराव्या दिवशीही देशातील सर्व बँकांबाहेर लांबच लांब रांगा दिसत होत्या. नोटाबंदच्या निर्णयानंतर 10 ते 18 नोव्हेंबर दरम्यान नऊ दिवसात देशभरातील बँकांमधून 1 लाख 3 हजार कोटी रुपये काढण्यात आले, तर याच काळात बँक खात्यांमध्ये 5 लाख 11 हजार 565 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे, याच काळात 33 हजार कोटींच्या जुन्या नोटा नागरिकांनी बदलून घेतल्या. तर ग्राहकांच्या वाढत्या गर्दीमुळे देशभरात एकूण 45 हजार एटीएम सेंटर कार्यरत झाले. जुन्या 500 च्या नोटा देऊन शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदीची मुभा दिली गेली. तर लग्न सोहळा असलेल्या कुटुंबीयांना रिझर्व्ह बँकांनी 2.5 लाख काढण्याची परवानगी एका नोटीफिकेशनच्या माध्यमातून दिली.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चलनतुटवड्याची समस्या दूर करण्यासाठी अनेक नागरिक इतर मार्गांचा शोध घेत होते. तसेच या निर्णयानंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत शेतकऱ्यांना बँकेतून काढलेले कर्ज चुकवण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
तसेच, बँकांकडून 1 कोटीपर्यंतच्या कर्जाचे 60 दिवसांपर्यंत हाप्ते न भरण्यास सुट देण्यात आली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यासाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे.