जालना : महाराष्ट्रात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा षडयंत्र देवेंद्र फडणवीसांनी उघडकीस आणलं असून मागील 6 महिन्यात 2 लाख 14 हजार बांगलादेशी (Bangladeshi) रोहिंग्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचे अर्ज देऊन बोगस कागदपत्र दिले, असा दावा भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलाय. 2 लाख 14 हजार अर्जांपैकी 1 लाख 13 हजार लोकांना जन्म प्रमाणपत्र मिळालं असल्याचं ही सोमय्या यांनी म्हटलंय. सर्वाधिक रोहिंगे वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातल्या टॉप 10 ठिकाणांमध्ये जालन्यातील भोकरदनचा समावेश असल्याचं देखील त्यांनी म्हंटलय,
दरम्यान, भोकरदन मध्ये 2 हजार 594 जन्म प्रमाणपत्राचे अर्ज आले. त्यापैकी 12 अर्ज सोडून बाकी अर्जांना मंजूरी देण्यात आल्याची माहिती ही सोमय्या यांनी दिलीय. बोगस जन्म प्रमाणपत्र वाटपाची चौकशी होऊन फॉरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे अशी मागणी ही सोमय्या यांनी केलीय.
तहसीलदारांवर निलंबणाची कारवाई, तहसीलदार संघटनेची उडी
दुसरीकडे, मालेगावमधील जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणावरून तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे आणि तत्कालीन नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना निलंबित केल्याच्या प्रकरणी आता तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनाने उडी घेतली आहे. तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात यावी, त्यानंतरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे.
मालेगावमध्ये मोठ्या संख्येने कथित बांगलादेशी आणि रोहिंग्यांना चुकीच्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी मालेगावचा दौरा करून गंभीर आरोपही केले होते. काही दिवसांपूर्वी प्राथमिक चौकशीच्या आधारावर मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे आणि तत्कालीन नायब तहसीलदार संदीप धारणकर या दोघांना निलंबित करण्यात आले होते. मात्र दोघांना त्यांचे म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी मिळाली नाही. शासनाने दोघांना त्यांच्या विरोधात कारवाई करण्यापूर्वी त्यांची बाजू ही ऐकून घ्यावी, अशी मागणी तहसीलदार संघटनेने केली आहे.
देशातून बांगलादेशी घुसखोरांना तातडीने हाकलून काढा
भारत देशातून बांगलादेशी घुसखोरांना तातडीने हाकलून काढा, अशी मागणी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने करून सरकारकडे ही मागणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात आणि राज्यांमध्ये बांगलादेशी यांची घुसखोरी झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चुकीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे त्वरित अशा घुसखोरांना देशाबाहेर हाकला अशी मागणी करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या