JharkhandExitPoll: झारखंडमध्ये निवडणुकीत काँग्रेस आघाडीचं सरकार बनणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या अंदाजानुसार व्यक्त केला आहे. एबीपी न्यूज सी व्होटर, टाइम्स नाऊ आणि इंडिया टुडे- एक्सिस माय इंडिया यांच्या सर्व्हेक्षणानुसार झारखंडमध्ये भाजप सरकार जाऊन काँग्रेस आघाडीचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. झारखंडमध्ये काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि आरजेडी यांनी सोबत निवडणूक लढवली होती. राज्यात एकूण  81 जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूक झाली होती. बहुमतासाठी कुठल्याही पक्षाला 41 चा आकडा पार करायचा आहे. या निवडणुकीचा निकाल 23 डिसेंबर रोजी लागणार आहे.

टाइम्स नाऊच्या सर्व्हेत भाजपला 28 जागा 
टाइम्स नाऊच्या सर्व्हेनुसार झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीला 44 जागा मिळू शकतात तर भाजपला  28 जागांवर विजय मिळू शकतो. इतरांना सहा जागा तर  झारखंड विकास मोर्चाला तीन जागा मिळू शकतात , असा अंदाज आहे. AJSU ला आपले खाते उघडता येणार नाही, असा अंदाज आहे.

इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया
इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये देखील काँग्रेस आघाडीकडेच सत्तेची चावी राहणार असल्याचा अंदाज होईल.  इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार काँग्रेस आघाडीला 43 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर भाजपच्या खात्यात 27 जागा जाण्याचा अंदाज आहे. या अंदाजानुसार मागील निवडणुकीतील आकड्यांपेक्षा दहा जागांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे.

एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार 

भाजप - 32
काँग्रेस+ - 35
झारखंड विकास मोर्चा- 03
ऑल झारखंड स्टुडंट युनियन - 05
इतर - 06

भाजप यावेळी राज्यात एकट्याने मैदानात उतरली आहे. सर्व्हेमध्ये भाजपला 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला दहा आणि काँग्रेसच्या सोबत असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाला 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच या आघाडीमध्येच असलेल्या  आरजेडीच्या खात्यात दोन जागा येण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेस, जेएमएम आणि आरजेडी एकत्रित निवडणूक लढत आहेत.

हेही वाचा - Jharkhand Exit Poll | झारखंडमध्ये भाजपला दणका तर काँग्रेस आघाडीला फायदा होण्याची शक्यता
2014 मध्ये कुणी किती जागा जिंकल्या होत्या ?

2014 च्या निवडणुकांमध्ये भाजपने ३७ जागा जिंकत  ऑल झारखंड स्टुडन्ट यूनियन (AJSU) सोबत सरकार स्थापन केलं होतं.  AJSU ने पाच जागा जिंकल्या होत्या. तर निवडणुकीनंतर झारखंड विकास मोर्चाच्या आठमधील सहा आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता. तर झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) 19, काँग्रेस 6 आणि इतर पक्षांनी सहा जागा जिंकल्या होत्या.

2014 च्या तुलनेत भाजपला पाच जागांचे नुकसान होणार असल्याचे चित्र आहे. तर जेव्हीएमला देखील पाच जागांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे.  AJSU ला मात्र आपल्या पाच जागा मिळतील असा अंदाज आहे. तर मागील वेळी सहा जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी दहा जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेसला चार आणि जेएमएमला चार जागांचा फायदा होणार असल्याचा अंदाज आहे.

कसा झाला आहे हा सर्व्हे?

या सर्व्हेसाठी झारखंड विधानसभेच्या सर्व  81 जागांवर एक्झिट पोळ घेण्यात आला होता. या अंतर्गत 405 पोलिंग बूथवर अभ्यास सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेसाठी जवळपास  37,000 लोकांशी संवाद केला होता.